रत्नागिरी : शिवसेना-भाजपमधील वाकयुद्ध, राजकीय टीका टिपण्णी सुरुच आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून परस्परांना लक्ष्य करणे, वरिष्ठ नेत्यांवर टीकेचे बाण सोडणे, कामकाजावर टीका करणे अशा गोष्टी सुरूच आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये जोरदार 'सामना' रंगताना दिसत आहे. दरम्यान, हे सारं सुरू असताना आता कोकणातील शिवसेना नेत्यानं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. अरे कोण नरेंद्र मोदी? बाळासाहेब ठाकरे नसते तर त्यांचं अस्तित्व केव्हाच संपलं असतं. अशी टीका कोकणातील शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी सावर्डे येथील एका मेळाव्यात बोलताना केली आहे.
अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी नरेंद्र मोदी यांना पक्षातून काढण्याबाबत गंभीर होते. त्यावेळी केवळ बाळासाहेब नरेंद्र मोदींच्या पाठिशी उभे राहिले. म्हणून नरेंद्र मोदी आज पंतप्रधान झाले. अन्यथा त्याच दिवशी मोदी घरी गेले असते. गुजरात दंगलीवेळी बाळासाहेब मोदींच्या मागे उभे राहिले नसते तर मोदींचं अस्तित्व केव्हाच संपलं असतं. शिवाय तुम्ही बाळासाहेबांच्या फोटोमुळे मोठे झालात. नरेंद्र मोदींच्या नाही अशा शब्दात यावेळी भास्कर जाधव यांनी थेट भाजपवर देखील निशाणा साधला. आपल्या भाषणादरम्यान जाधव यांनी देवेंद्र फडणवीसांसह चंद्रकांत पाटील, किरिट सोमय्या यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. सावर्डे येथील मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा जाधव यांच्या या विधानामुळे दोन्ही पक्षांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप रंगण्याची शक्यता आहे.
आणखी काय बोलले जाधव?
आपल्या भाषणाला सुरूवात करताना जाधव यांनी काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. शिवसेनेमध्ये सुरूवातीला असताना संघर्षाचा काळ कसा होता? याची काही उदाहरणं देखील त्यांनी दिली. त्यानंतर मात्र आपल्या जवळपास 55 मिनिटाच्या भाषणात जाधव यांनी जवळपास 10 मिनिटं भाजपवर हल्लाबोल चढवला आहे. यावेळी बोलताना जाधव यांनी 'काल उद्धव ठाकरेंनी भाषण केलं, आज भाजपच्या लोकांनी कोल्हेकुई सुरू केली. मराठी माणसावर सध्या कारवाई केली जात आहे. याचा अर्थ केवळ मराठी माणसं भ्रष्टाचारी आहेत. बाकी कुणी नाही? विरोधात बोलल्यानंतर थेट चौकशी लावली जाते. आता मराठी माणसाला संपवण्याचा डाव असून यापूर्वी ईडी, एनसीबी, सीबीआय नव्हती का?' असा सवाल देखील जाधव यांनी करत राज्यातील कारवायांबाबत थेट भाजपला सवाल केला आहे. आपल्या भाषणादरम्यान भास्कर जाधव यांनी अजित पवार, भावना गवळी, हसन मुश्रीफ यांच्यासह इतर नेत्यांवर झालेल्या कारवाईचा देखील दाखला दिला.
दरम्यान 'केवळ राज्यात नव्हे तर देशात देखील भाजप शिवसेनेमुळे मोठी झाली. देशावर संकट आल्यानंतर शिवसेना भवनातून एका वाघाची डरकाळी फुटायची आणि तो वाघ म्हणजे बाळासाहेब ठाकरे! अशा शब्दात जाधव यांनी भाजपनं शिवसेनेवर हिंदुत्वाच्या मुद्यावरून केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. यावेळी अमरनाथ यात्रा, 1993 साली झालेली मुंबईतील दंगलींसह काही उदाहरणं देखील जाधव यांनी दिली आहेत. 'काँग्रेसने 70 वर्ष राज्य केलं. पण कधीही सेनाभावनावर टीका केली नाही. मात्र, जी भाजप शिवसेनेचं बोट धरून राज्यातच नव्हे तर देशात उभी राहिली तीच भाजप आज सेनाभवनवर टीका करत आहेत. बाळासाहेब स्वर्गवासी झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीला भाजपनं धोका दिला. महाविकास आघाडीवर टीका करत असताना 80 तासाचं सरकार पहिल्यांदा कुणी केलं? तुम्ही खणलेल्या खड्ड्यात उद्धव ठाकरेंच्या कल्पकतेमुळे तुम्ही पडलात' अशी टीका देखील भास्कर जाधव यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.
विश्वासघात तुम्ही केला - जाधव
दरम्यान, 'पहिल्यांदा विश्वासघात तुम्ही केलात, आम्ही नाही. विश्वासघाताला क्षमा नाही हे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं आहे. तुम्ही आम्हाला एक दिवस देखील मुख्यमंत्रीपद देणार नव्हता. पण, आता 5 वर्षे आमचा मुख्यमंत्री राहणार आहे. आमचं सरकार तीन पायांचं? मग यांचं काय? तुमच्यासोबत देखील किती जण आहेत ते पाहा. आमच्यावर हिंदुत्वावरून टीका करण्यापेक्षा तुम्ही देखील कुणासोबत आहात. कुणासोबत युती केली ते देखील पाहा. काश्नीरमध्ये पीडीपीसोबत जाताना तुम्ही हिंदुत्व कुठं ठेवलं होतं?
मुंबई महानगरपालिकेवर ताबा मिळवण्यासाठी भाजपची धडपड सुरू आहे. भाजप केवळ मराठी माणसांना संपवण्याचा घाट घालत आहे. अशी टीका देखील आपल्या भाषणादरम्यान भास्कर जाधव यांनी केली आहे.