Ratnagiri News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सुपारी घेऊन काम करतात, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केला आहे. राज ठाकरे यांनी मुंबईतील गट प्रमुखांच्या मेळाव्यात मनसेने आतापर्यंत केलेल्या आंदोलनावर भाष्य केलं. तसंच उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांवरही टीकेचे बाण सोडले. यावर खासदार विनायक राऊत यांनी टीका केली. "मनसेने फक्त स्वप्न पहावी, अस्तित्व नाही. निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे सुपारी घेऊन काम करतात," असं राऊत म्हणाले. ते रत्नागिरीतील (Ratnagiri) पत्रकार परिषदेत बोलत होते.


मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तयारीला लागा. मी तुमच्या हाती महापालिकेची सत्ता आणून देतो, असं राज ठाकरे गटप्रमुखांच्या मेळाव्याला संबोधित करताना म्हणाले होते. त्यावर विनायक राऊत म्हणाले की, "त्यांनी फक्त स्वप्न पाहावीत. निवडणूक आली की अस्तित्त्व दाखवण्यासाठी असे मेळावे घ्यायचे. निवडणुकीच्या वेळी कोणाची ना कोणाची सुपारी वाजवायची हा धंदा मागील अनेक वर्षांपासून राज ठाकरे यांनी चालू केलेला आहे." विनायक राऊत पुढे म्हणाले की, "राज ठाकरे फक्त नक्कल करुन राजकारण करत आहेत. बाळासाहेबांचं नाव घेऊन उद्धव ठाकरे यांची नक्कल करायची. पायाला ठेच लागली तरी तुम्ही मुंबईला अॅडमिट होता. उद्धव ठाकरे यांचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर होतंय ही राज ठाकरे यांची पोटदुखी आहे."


राज ठाकरे काय म्हणाले होते?
राज ठाकरे यांनी 27 नोव्हेंबर रोजी मुंबईतील गोरेगावमधल्या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. "कालपरवापर्यंत मुख्यमंत्रीपदावर असलेले आणि आता बाहेर पडलेले तब्येतीचं कारण सांगून घरात बसले. एकनाथ शिंदेंनी रात्रीच्या रात्री कांडी फिरवली अन् आता हे सगळीकडे फिरत आहेत. यांच्यासारखं वागणारा मी नाही. स्वत:च्या स्वार्थासाठी दिसेल तो हात हातात घेणारा मी नाही. मी यांच्यासारखा नाही. उद्धव ठाकरेंच्या अंगावर एकतरी केस आहे का? कधी भूमिका घेतलीच नाही. पैशासाठी, स्वार्थासाठी कधी हा कधी तो, मला सत्तेत बसवा अशी भूमिका घेतली. फक्त पैशासाठी आणि सत्तेसाठी याच्यासोबत त्याच्यासोबत गेले," असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं.


शिंदे-फडणवीस सरकारकडून महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचं काम
कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावरही ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचं काम शिंदे-फडणवीस सरकारकडून केलं जात आहे. अनेक वर्षांपासून कर्नाटक सरकारचा आगाऊपणा सुरु आहे. मात्र सत्तेसाठी लाचार झालेलं शिंदे-फडणवीस सरकार याकडे कानाडोळा करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. सांगलीतील तिकोंडी आणि उमराणीमध्ये कर्नाटकच्या ध्वजासह पदयात्रा काढण्यात आली. यावर विनायक राऊत म्हणाले की, "अनेक वर्षापासून कर्नाटकचा आगाऊपणा सुरु आहे. पण या सरकारने त्यांच्यावर कुठलाही प्रतिबंध केला नाही म्हणून त्यांचं धाडस होत आहे. कर्नाटकचे लोक येऊन भाषेचा प्रांतवाद करत आहेत. हे थांबवणं महाराष्ट्राच्या सरकारचं काम आहे." तसंच कर्नाटकची नाकेबंदी करण्याची ताकद शिवसेनेत असल्याचंही राऊत म्हणाले.


भूमाफियांची झोळी भरण्यासाठी उद्योगमंत्र्यांचे धंदे, राऊत यांची उदय सामंतांवर टीका
आमदार राजन साळवी रिफायनरी समर्थनाची बाजू घेतल्याने त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी त्यांना संरक्षण द्या, असं आवाहन विनायक राऊत यांनी केली. रत्नागिरीतील प्रस्तावित रिफायनरीबाबत बोलताना विनायक राऊत म्हणाले की, "रिफायनरी प्रकल्प पुढील 10 वर्ष होणार नाही. परप्रांतियांच्या हितासाठी रिफायनरी आणायची आहे. भूमाफियांची झोळी भरण्यासाठी उद्योगमंत्र्यांचे धंदे सुरु आहेत. रिफायनरीसाठी उद्योग खाते मागून घेतलं. त्यांना दलालांना भेटण्यासाठी वेळ आहे, ग्रामस्थांसाठी नाही, अशा शब्दात विनायक राऊत यांनी उदय सामंत यांच्यावर टीका केली. तसंच उद्योगमंत्र्यांच्या विरोधात रत्यावर उतरणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. जैतापूरचं झालं तसंच रिफायनरीचं होणार, असंही ते म्हणाले.