Ranjitsinh Mohite-Patil on Devendra Fadnavis, Solapur : एका बाजूला भाजपचे विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी माळशिरस मधील पराभूत उमेदवार राम सातपुते आणि भाजप जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार यांनी वरिष्ठानकडे लावून धरली असताना आमदार मोहिते पाटील यांनी सोशल मीडियात देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनच्या पोस्ट व्हायरल केल्या आहेत. यावर त्यांनी भाजपचे कमळ असेलेले ग्राफिक्स लावत त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 


रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी बावनकुळे यांची भेट घेत केला होता सत्कार 


 मोहिते पाटील यांच्यावर निलंबनाबाबत सोलापूर जिल्ह्यातून तक्रारी वाढत असताना चार दिवसापूर्वी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची भेट घेत पुष्पगुच्छ दिले होते. तो ही फोटो त्यांनी व्हायरल केला होता .. राज्यात महायुती प्रचंड बहुमताने निवडून आल्यामुळे पुन्हा एकदा आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील हे भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत आहे. 


लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचार केल्याची चर्चा 


लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांच्या संपूर्ण कुटुंबाने सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा उघड प्रचार केला होता. लोकसभेला त्यांचे चुलत भाऊ धैर्यशील मोहिते पाटील यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी थेट शरद पवार गटात प्रवेश करून भाजपचा पराभव केला होता. मोहिते पाटील कुटुंबाने माढा व सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपला पराभूत करण्याचा प्रयत्न केल्याने सोलापूर जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून हकालपट्टीची मागणी केली होती. आता देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड होत असल्याने पुन्हा आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपचे कमळ चिन्ह वापरून त्यांचे अभिनंदन केले आहे.


आमदार रणजितसिंह मोहिते यांची भाजपमधून हकालपट्टी करा अशी मागणी काही दिवसांपूर्वी माळशिसरचे माजी आमदार राम सातपुते यांनी केली होती. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती. मोहिते पाटील यांच्या कारखान्याला 113 कोटी रुपये देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, त्यातील अर्धे पैसा मला पाडण्यासाठी मोहिते पाटलांनी वापरल्याचा आरोप राम सातपुते यांनी केला होता. 


इतर महत्त्वाच्या बातम्या


एकनाथ शिंदेंचा योग्य तो सन्मान झाला पाहिजे, रामदास आठवलेंची अमित शाह यांच्याशी चर्चा, उद्धव ठाकरेंवरही बोलले