सातारा:  सातारा जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा संघर्ष पाहायला मिळाला होता. रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या संघर्षाची चर्चा फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यात झाली होती. सध्या रामराजे नाईक निंबाळकर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. तर, रणजीतसिंह नाईक निंबाळकर भाजपमध्ये आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सध्या महायुतीत आहेत. रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजीतसिंह नाईक निंबाळकर काही दिवसांपूर्वी एकाच मंचावर एकत्र आले होते. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन होईल, अशा चर्चा सुरु होत्या. त्यासंदर्भात रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Continues below advertisement

विकासाच्या राजकारणासाठी मनोमिलन होईल : रामराजे नाईक निंबाळकर

मनोमिलन हे एकतर्फी प्रेमातून होत नाही. विकासाचं राजकारण करायचं असेल तर मनोमिलन होईल. राजकारण करायचं असेल तर विचार करावा लागेल, असं विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटलं.  फलटणचे भाजपचे माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर आणि माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. मात्र अलीकडच्या काळात दोघांच्याही मनोमिलनाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या मनोमिलनाच्या चर्चेवर प्रथमच रामराजेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मनोमिलन हे एकतर्फी प्रेमातून होत नाही. विकासाचं राजकारण करायचं असेल तर मनोमिलन होईल. राजकारण करायचं असेल तर विचार करावा लागेल. वरिष्ठांनी सांगितलं तर होईल. नाहीतर हे मनोमिलन होणार नाही. हा निर्णय लोकांच्या हातात आहे लोक ठरवतील, अशी प्रतिक्रिया देऊन रामराजे यांनी मनोमिलनाचा चेंडू रणजीत नाईक निंबाळकर यांच्या कडे ढकलला आहे. यामुळे रणजीत नाईक निंबाळकर यावर काय बोलतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे

Continues below advertisement

दोन्ही नेते एका कार्यक्रमात एकत्र

फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर आणि माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे एकाच व्यासपीठावर आलेले पाहायला मिळाले होते. व्यासपीठावर दोघे एकत्र असताना दोघांनी एकमेकांसोबत बोलणे टाळले होते. मात्र रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या  भाषणात रणजीत निंबाळकर आणि माझे भांडण आहे म्हणजे आम्ही एकमेकांची कॉलर पकडायची का? दोघांनाही कुठे थांबायचे हे चांगले समजते. मतभेद असले तरच लोकशाही टिकते.  हे वैयक्तिक भांडण नाही ज्याला त्याला आपली मते आहेत ते आपण मांडत असतो असे यावेळी ते म्हणाले होते. मात्र त्यानंतर रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या भाषणात रामराजे यांच्या विषयी बोलणे टाळले होते.