मुंबई : उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी गोरेगावातील नेस्को सेंटर येथे दसरा मेळाव्याला संबोधित केलं. या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. याचवेळी एकनाथ शिंदेंनी नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ जोरदार बॅटिंग केली. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना पीएम केअर फंडमधून मदत द्यावी, अशी मागणी केली होती. याच्यावर टीका करताना शिंदेंनी पीएम केअर योजना ही कोविडसाठी होती एवढंही कळत नाही, असा हल्लाबोल केला.
Eknath Shinde on Narendra Modi मोदी बेदाग आहेत : एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे पुढं म्हणाले, मोदींनी शेतकऱ्यांसाठी सन्मान योजना सुरु केली होती. राज्यानं देखील योजना सुरु केली.अमित शहांनी 10 हजार कोटी माफ केले. 70 वर्षात काँग्रेसचा इतिहास पाहा महाराष्ट्राला त्यांनी 2 लाख कोटी दिले. मोदी सरकारने 5 पट 10 लाख कोटी रुपये दिले आहेत. 76 हजार कोटींचं वाढवन बंदर होतंय. अटल सेतू, नवी मुंबई विमानतळ 6 ते 7 तारखेला मोदींच्या हस्ते लोकार्पण होत आहे, असं शिंदे म्हणाले.
मोदी आमच्या मागे उभे आहेत याचा सार्थ अभिमान आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. पहलगाममध्ये आपल्या बहिणीचं कुंकू पुसण्याचं काम पाकड्यांनी केलं त्यांना धडा शिकवण्याचं काम मोदींनी केले. खून का बदला खून, गोलीका जवाब गोलेसे, असं धोरण मोदींचं असल्याचं शिंदे म्हणाले.
10 वर्षात यूपीएने भ्रष्टाचाराचा कळसं गाठला. 2014 नंतर बघा मोदींनी सत्ता हाती घेतल्यावर घोटाळेबाज तुरूगांत गेले. मोदींवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप करण्याची हिंमत केलेली नाही. मोदी बेदाग आहेत बेदाग, असं शिंदे म्हणाले.
बाळासाहेबाचं स्वप्न कोणी पूर्ण केलं? राममंदीर कोणी बांधलं? कलम 370 कोणी काढलं? हे सर्व मोदीजींनी केलं, असं एकनाथ शिंदे यांनी म्हणत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
कटप्रमुख म्हणत उद्धव ठाकरेंवर टीका
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, बाळासाहेबांनी काँग्रेसला गाडा म्हटलं तेव्हा तुम्ही डोक्यावर घेतलं हे तुमचं हिंदुत्व? मुख्यमंत्री पदाच्या खूर्चीसाठी तुम्ही सर्व घालवलं. पक्षातील लोकं संपवण्यासाठी काम करतं कोण हे पक्ष प्रमुख नाही हे कारस्थान करणारे कट प्रमुख आहेत, असा हल्लाबोल शिंदेंनी केला.
लोकं का जात आहेत त्याचं आत्मपरीक्षण करणार की नाही, असा सवाल शिंदेंनी ठाकरेंना केला. जगात असा कोणी अध्यक्ष नसेल ज स्वत:च्याच लोकांना संपवतो.आज बाळासाहेबांसमोर किती लोकं बसायची आता काय परिस्थिती आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर त्यांची सावली तरी सोबत राहिल का ?, असा प्रश्न एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना केला.