मुंबई: देशभरात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) सर्वेसर्वा रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी एक महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. त्यांनी लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024) लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी शिर्डी आणि सोलापूर हे मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला दिले जावेत, असे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात मी लवकरच पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्याशी चर्चा करेन. परंतु, महायुतीने आमच्या आरपीआय पक्षाला एकही जागा सोडली नाही तर आम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असे रामदास आठवले यांनी म्हटले. ते रविवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.


यावेळी रामदास आठवले यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तीव्र इच्छा जाहीर केली.  भाजपने आणि एकूणच आमच्या एनडीएने "अब की बार 400 पार" ही घोषणा दिली आहे. त्यामध्ये आमच्या 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया'चे सुद्धा मोठे योगदान आहे. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की, महायुतीने मला शिर्डी लोकसभा निवडणुक लढवू द्यावी. मी स्वतः शिर्डी लोकसभा मधून दोन वेळा खासदार झालो आहे. तिसऱ्यांदा मला हार पत्करावी लागली. पण मला परत आता शिर्डी लोकसभा निवडणुक लढवायची आहे. मी सध्या राज्यसभेत असलो तरी मी लोकसभेचा माणूस आहे. मला लोकसभेत येण्याची इच्छा आहे, असे रामदास आठवले यांनी सांगितले. आता आठवलेंच्या या प्रस्तावावर भाजप काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल.


शरद पवारांसाठी यंदा बारामतीची लढाई अवघड: रामदास आठवले


यावेळी रामदास आठवले यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणाबाबत भाष्य केले. शरद पवार हे खूप मोठे नेते आहेत. त्यांनीच मला मंत्रिपदाची पहिली संधी दिली होती. शरद पवार हे एक अभ्यासू नेते आहेत. पण जर त्यांना निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य नसेल तर त्यांनी कोर्टात जावे.  बारामती हा पूर्वी शरद पवार आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता पण आता तो महायुतीचा गड आहे. कारण 2014 लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर बारामती मधून लोकसभेसाठी उभे होते तेव्हा महादेव जानकर खूप थोड्या मतांनी हरले होते. आता मात्र बारामती लोकसभा सोपी नसेल. सुनेत्रा पवार तिथून लोकसभेसाठी  उभ्या राहणार आहेत, असे रामदास आठवले यांनी म्हटले.




आमच्यामुळे भाजपला SC मतं मिळू लागली: आठवले


भाजपा आणि मित्रपक्षांची जी काही महायुती झाली, ती काही फक्त अजित पवार गट सामील झाला म्हणून नव्हे, तर आम्हीसुद्धा भाजप मध्ये आहोत म्हणून झाली. भाजपाच्या मित्रपक्षांनाही आंबेडकरवादी मतं पूर्वी मिळत नव्हती. पण आम्ही जेव्हा भाजपाच्या सोबत युती केली तेव्हा 2012 पासून SC मतं भाजपाला मिळू लागली आहेत, असा दावा रामदास आठवले यांनी केला.



हंडोरेंना राज्यसभेची उमेदवारी देण्याचा काँग्रेसचा निर्णय योग्य: रामदास आठवले


काँग्रेस पक्षाने चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभा दिली हे खूप योग्य केले आहे. चंद्रकांत हांडोरे पूर्वी आमच्या पक्षात होते. आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्याला राज्यसभेवर जाण्याची संधी दिली हे योग्य केलं आहे. चंद्रकांत हांडोरे यांनी समाजासाठी त्यांच्या कामकाजातून योगदान दिले आहे. काँग्रेसने चंद्रकांत हांडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आणि मलिक्कार्जून खरगे यांना पक्षाध्यक्ष केले, हे ठीक आहे. पण जेव्हा कर्नाटकमध्ये काँग्रेस जिंकल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून मालिक्कर्जून खरगे यांचा विचार देखील केला नव्हता, याकडे रामदास आठवले यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.


आणखी वाचा


मराठ्यांना आरक्षण मिळावं, पण..; रामदास आठवले मनोज जरांगेंच्या आंदोलनावर स्पष्टच बोलले