Ramdas Athawale नाशिक : मी शिर्डीच्या (Shirdi) जागेवर आग्रही होतो. शिर्डीत सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी देण्यात आल्याने लोकसभा निवडणुकीत रिपाईला एकही जागा मिळाली नाही. मात्र मला राज्यसभेत संधी मिळणारच आहे. यावेळी मला कॅबीनेट मंत्रीपद देण्यात येणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह अन्य नेत्यांनी दिल्याचा दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी नाशिकमध्ये (Nashik News) केले आहे. 


रामदास आठवले म्हणाले की, संपूर्ण देशात निवडणूक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढवत आहे. बरेचशे प्रश्न प्रलंबित होते ते आम्ही पूर्ण केले. त्यामुळे आम्हाला विजयाची खात्री आहे. साऊथ इंडिया, तेलंगणा, आंध्र प्रदेश या ठिकाणी मी जाऊन आलो. तेलंगणात भाजपच्या चार जागा होत्या आता त्या वाढतील. उत्तर प्रदेशात 70 ते 75 जागांचे टार्गेट आहे. एनडीए चारशे पेक्षा जास्त जागा मिळतील.  


आठवलेंचा महाविकास आघाडीला टोला 


आम्ही महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) देत आहेत टक्कर,  महाविकास आघाडीच्या नेत्यांना आली पाहिजे चक्कर, अशा टोला त्यांनी यावेळी लगावला. तीन पक्षांची त्यांची महाविकास आघाडी आहे. विकासाचे नाव काढलं पाहिजे ती महाआघाडी आहे.  मोदींनी एवढा विकास केल्यानंतरही तरी ते म्हणतात विकास होत नाही. ते कितीही बोलले तरी मोदींना विजय निश्चित मिळेल, असेही त्यांनी म्हटले.  


जे पी नड्डांच्या वक्तव्यावर काय म्हणाले रामदास आठवले? 


भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी भाजपला (BJP) एकेकाळी संघाची गरज लागत होती. पण, आता सक्षम असल्यानं आम्ही आमचा पक्ष चालवतो, असे वक्तव्य केले. यावर रामदास आठवले म्हणाले की, जे पी नड्डा काय बोलले मला माहित नाही. पण गरज नाही, असे मी बोलणार नाही. काही प्रमाणात आरएसएसचाही सहभाग आहे, असे त्यांनी म्हटले.    


भुजबळ साहेब नाराज असण्याचे कारण नाही


छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज असल्याच्या चर्चा आहेत. यावर रामदास आठवले म्हणाले की,  भुजबळ साहेब नाराज असण्याचे कारण नाही. भुजबळ यांनी निवडणूक लढवण्याचा ठरवलं होतं झाल्यामुळे नाराज असणं साहजिकच आहे. त्यांची नाराजी दूर करू, महायुतीच्या प्रचारार्थ ते आले आहेत, असे त्यांनी म्हटले. 


मला कॅबीनेटचे आश्वासन 


रिपब्लिकन पक्ष हा छोटा पक्ष आहे. आमचे किती आमदार, खासदार, नगरसेवक आहेत. त्यापेक्षाही आरपीआय मध्ये किती गट आहे.तरी आमचे नागालँडमध्ये आणि अंदमानमध्ये आमदार आहेत. मी शिर्डीच्या जागेवर आग्रही होतो, शिर्डीच्या जागेसाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रयत्न केले. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) ऐकलं नाही आणि एकनाथ शिंदे यांचं म्हणणं होतं की सदाशिव लोखंडे माझ्यासोबत आले आहे. त्यामुळे मला तिकीट मिळालं नाही. मात्र मला राज्यसभेत संधी मिळणारच आहे. यावेळी मला कॅबीनेट मंत्रीपद देण्यात येणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेत्यांनी दिले, असे त्यांनी म्हटले.  


आणखी वाचा 


भाजपला आता आरएसएस नकोय, ज्या शिडीने वर आले तीच सोडायला तयार; प्रकाश आंबेडकरांचा टोला