Ramdas Athawale : गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे एकत्र येतील, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गट (NCP Sharad Pawar Faction) आणि अजित पवार गट (NCP Ajit Pawar Faction) देखील एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली आहे. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मोठं वक्तव्य केलंय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत असतील तर मला आणि प्रकाश आंबेडकर यांना एकत्र यावं लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.

रामदास आठवले म्हणाले की, शरद पवार आणि अजित पवार एकत्र होते आणि आजही एकत्र आहेत. अजित पवारांचं म्हणणं एकच होतं की, तुम्हाला शिवसेना चालते तर भाजप का चालत नाही? शरद पवार साहेबांसारखा माणूस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खांद्याला खांद्या लावून या देशाच्या प्रगतीसाठी, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सोबत आले असते तर शरद पवार या देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते. मात्र, अजूनही ती वेळ गेलेली नाही. शरद पवार हे अजित पवार यांच्यासोबत एकत्र येऊन त्यांचा एनडीएला पाठिंबा मिळत असेल तर शरद पवार यांचे स्वागतच आहे, असे त्यांनी म्हटले. 

तर मला आणि प्रकाश आंबेडकर यांना एकत्र यावं लागेल

रामदास आठवले पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत असतील तर मला आणि प्रकाश आंबेडकर यांना एकत्र यावं लागेल.  तरी मला अस वाटतं की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार नाहीत. ते  एकत्र आले तरी महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल आणि त्याचा आम्हाला फायदा होईल. दोघांना एकत्रित यायचं असेल तर त्यांनी यावं. पण, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फारसा बदल होणार नाही, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.

डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी आम्हाला नको

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावानंतर शनिवारी (दि. 10) दोन्ही देशांमध्ये शस्त्रविरामावर सहमती झाली. मात्र, या शस्त्रविरामाची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी केल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर ही बाब चर्चेचा विषय ठरली आहे. आता यावर रामदास आठवले यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, पाकिस्तान हा  आतंकवाद्यांना प्रोत्साहन देणारा देश आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या बद्दल आम्हाला आदर आहे. पण, पाकव्याप्त काश्मीर आमच्या ताब्यात आलं पाहिजे, त्यासाठी युद्ध केलं पाहिजे. वेळ आली तर पाकिस्तानला ताब्यात घेतलं पाहिजे, ही भूमिका मी अनेक वेळा मांडली आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि कोणाची मध्यस्थी आम्हाला यामध्ये नको आहे. आतंकवादी कारवाया थांबवल्या आणि पाकव्याप्त काश्मीर आम्हाला सोपवला तर डायरेक्ट भारत पाकिस्तान बरोबर चर्चा करायला तयार आहे. युद्धाची आवश्यकता अजिबात नाही. आमची भूमिका आहे की, पाकव्याप्त काश्मीर आम्हाला मिळाला पाहिजे. युद्ध विरामासाठी पाकिस्तानकडून विनंती करण्यात आली. पाकिस्तानने आपली हार मान्य केली, असे त्यांनी म्हटले.  

आणखी वाचा 

Nilesh Lanke : लंकेंच्या कार्यालयात आजही अजितदादांचा फोटो, प्रश्न विचारताच खासदार निलेश लंके म्हणाले, पवार इज द पॉवर!