Ram Shinde : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Winter Session 2024) आज चौथा दिवस आहे. विधानपरिषदेमध्ये आज सभापतीपदाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. भाजपचे आमदार आणि माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांची विधानपरिषद सभापतीपदी एकमताने निवड करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत सर्व नेत्यांनी राम शिंदे यांच्यावर ही जबाबदारी सोपवली.


विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांना सभापतीपद द्यावे अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. पण भाजपने हे पद शिवसेनेला देण्यास नकार दिला होता. त्यानंतर भाजपकडून महाराष्ट्र विधान परिषद सभापती निवडणुकीसाठी राम शिंदे यांचे नाव जाहीर करण्यात आले. आज त्यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. सभापती पदासाठी श्रीकांत भारतीय यांनी प्रस्ताव मांडला. त्यानंतर नीलम गोऱ्हे यांनी सभापती म्हणून एकमताने राम शिंदे यांना निवडण्यात येत असल्याचे जाहीर केले.  


राम शिंदे 'सर' असल्याने त्यांना क्लास चालवण्याची सवय : देवेंद्र फडणवीस 


यावेळी सभापती निवडीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राम शिंदे सर आहेत. त्यामुळे क्लास कसा चालवायचा याची त्यांना सवय आहे. मला विश्वास आहे की, आपण अतिशय शिस्तीने आणि संवेदनशीलतेने कार्यभार चालवाल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित त्यांच्या कुटुंबातील नवव्या पिढीतील व्यक्ती सभागृहात खुर्चीवर बसत आहे. एकप्रकारे त्यांना वाहिलेली ही श्रद्धांजली आहे. मुगलांनी ज्यावेळी हिंदू मंदिर संपवली होती त्यावेळी मंदिर उभारणीचे काम अहिल्यादेवी होळकर यांनी केले होते. सरपंच पदापासून सुरू झालेला आपला प्रवास आता सभागृहाच्या सर्वोच पदापर्यंत आला आहे. चौंडी गावाचे सरपंच म्हणून आपण काम केले आहे. कधी कधी वाईटातून चांगलं होतं असतं. आपण थोड्या मतांनी विधानसभेला पडलात. परंतु, कदाचित नियतीच्या मनात तुम्हाला विधानपरिषद सभापती करायचं असेल त्यामुळे नियतीने हे केले असेल, असे त्यांनी यावेळी म्हटले. 


रामभाऊ कुणावर अन्याय करणार नाहीत : एकनाथ शिंदे


तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आपण दोघे शिंदे आहोत, त्यामुळे काही अडचण नाही. रामभाऊ कुणावर अन्याय करणार नाहीत. सर्वांचे लाडके भाऊ ते आहेत. नावात राम आणि आडनावात शिंदे आहेत. त्यामुळे सर्वांच ऐकून घेतील. आणि काम पण करतील. 


...तर गिरीश महाजनांचं मंत्रिपद गेलं असतं : अजित पवार


अजित पवार म्हणाले की, या विधानसभेचे वैशिष्ट्य पाहील तर अनेक तरुण आमदार निवडून आले आहेत. विधानसभेचे अध्यक्ष देखील तरुण आहेत तर परिषदेत देखील तरुण सभापती बसवले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपल्याबद्दल सांगितलं मात्र आपण अजूनही चाळीशीत आहात, असेच वाटत आहे. मधल्या काळात राम शिंदे सर तुम्ही म्हणालात अजित पवारांनी माझा इथ सभा घेतली नाही. माझ्यामुळे पराभव झाला अस आपण बोललात. मात्र जे झालं ते चांगल झालं आपण सभापती झालात. कदाचित आपण निवडून आला असता आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मनात तुम्हाला कॅबिनेट मंत्रिपद द्यावं वाटलं असतं तर गिरीशच मंत्रिपद गेलं असतं, असा टोला त्यांनी यावेळी गिरीश महाजन यांना लगावला.


आणखी वाचा 


उत्तर कर्नाटकावर चर्चा होत मुंबईला केंद्रशासित करण्याची मागणी; काँग्रेस आमदाराने अकलेचे तारे तोडले