Shivraj Bangar : राम खाडे (NCP Ram Khade) यांच्यावर जो हल्ला झाला त्याचे कारण संपूर्ण बीड जिल्ह्याला माहित आहे. आष्टीचे श्री संत आमदार सुरेश धस आणि राम खाडे यांचा वैचारिक लढा असून हा वाद सुप्रीम कोर्टापर्यंत चालू आहे. सुप्रीम कोर्टात प्रकरण सुरू असताना राम खाडे यांचा शस्त्र परवाना रद्द केला जातो. पोलीस संरक्षण काढले जाते, हे कोणाच्या सांगण्यावरून काढले जाते? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते शिवराज बांगर यांनी उपस्थित केला. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस अधीक्षकांची देखील भेट घेणार आहोत असेही ते म्हणाले.

Continues below advertisement

Shivraj Bangar : राम खाडे यांच्यावरचा हा पहिला नव्हे तर तिसरा जीवघेणा हल्ला

समाजसेवकांवर हल्ले घडून आणायचे आणि आपण समाज सुधारक आहोत, असा आव आणायचा ही परिस्थिती गंभीर आहे. यातील मुख्य आरोपी आणि कट करणारे हात यात आरोपी झाले पाहिजे. राम खाडे यांच्यावरचा हा पहिला हल्ला नाही, तर तिसरा हल्ला आहे. न्यायालयाने त्यांना शस्त्र परवाना दिला होता आणि ही जी खदखद आहे ती सुरेश धस आणि राम खाडे यांच्यात सुरू आहे. ही परिस्थिती असताना राम खाडे यांच्यावर हल्ला होतो.

Continues below advertisement

सुरेश धस यांच्या नात्यातील काही टिप्पर राम खाडे यांनी तहसीलदार काल-परवा लावायला सांगितले होते. त्यानंतर सोसायटीच्या जमिनीवरील शॉपिंग कॉम्प्लेक्सवर आणण्याचं काम राम खाडे यांनी केलं होतं. त्यामुळे पाणी कुठे ना कुठे मुरते आहे. यात सुरेश धसच काय तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो असेही शिवराज बांगर म्हणाले.

Bajarang Sonawane : हल्लेखोरांना तात्काळ अटक करा; खासदार बजरंग सोनवणे यांची मागणी

आष्टी मतदारसंघाचे विधानसभा अध्यक्ष राम खाडे यांच्यावर भ्याड हल्ला झाला आहे. या हल्लेखोरांना तात्काळ अटक केली पाहिजे. याचा सूत्रधार कोण आहे, ते देखील बघितलं पाहिजे. यासाठी मी मुख्यमंत्र्यांना बोलणार आहे. बीडचे पोलीस अधीक्षक यांच्यासोबत माझे बोलणे झाले आहे. रात्री घटना उशिरा झाल्यामुळे मला आज समजली. प्रत्यक्ष खाडे यांच्यासोबत माझे बोलणे झालेलं नाही. या प्रकरणाची सर्व माहिती घेऊन भ्याड हल्ल्या करणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, याच्या पाठीमागे कोण आहे त्याला पकडलं पाहिजे.

राम खाडे अन्यायाला वाचा फोडणारा कार्यकर्ता आहे. अशा कार्यकर्त्यावर अत्याचार होत असेल तर प्रशासनाने सोडले नाही पाहिजे. खासदार म्हणून मी त्यांच्यासोबत आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे (Bajarang Sonawane) यांनी दिलीय.

Jayant Patil : कोणाच्या सांगण्यावरून त्यांची सुरक्षा अचानक काढून घेतली?

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ते रामभाऊ खाडे यांच्यावर काल अहिल्यानगर येथील मंदाली गावातील एका हॉटेलजवळ अनोळखी व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्याचा मी जाहीर निषेध करतो. रामभाऊ खाडे हे गेल्या अनेक वर्षांपासून शासनातील भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचा पर्दाफाश करत आहेत. मध्यंतरी त्यांनी आष्टी तालुक्यातील विविध देवस्थान इनाम जमिन घोटाळा बाहेर काढल्यामुळे त्यांच्या व‌ त्यांच्या कुटुंबीयांच्या जीविताला धोका होता. म्हणून मी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खाडे यांना सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी पत्राद्वारे केली होती.

तसेच न्यायालयानेही त्यांना पोलिस सुरक्षा दिली होती, मात्र गृह विभागाने कोणाच्या सांगण्यावरून त्यांची सुरक्षा अचानक काढून घेतली याची माहिती नाही. हे अत्यंत धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिलीय. सरकारच्या भ्रष्टाचार आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्याला अशा प्रकारे संपवण्याचे काम केले जात असेल तर महाराष्ट्र पुरोगामी राज्याच्या प्रतिमेला हे शोभणारे नाही. माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की, या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देत आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी. अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या