Rajan Vichare Vs Pratap Sarnaik: मराठीच्या मुद्द्यावरुन राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदे यांना एक जाहीर पत्र लिहून उद्धव (Uddhav Thackeray) यांना लक्ष्य केले होते. या पत्रात सरनाईक यांनी ठाकरेंनी मराठीसाठी काय केले, असा प्रश्न विचारला होता. तसेच उद्धव ठाकरेंविषयी उणीदुणी पत्रातून जगजाहीर केली होती. या पत्राला ठाकरे गटाचे खासदार आणि ठाण्यातील प्रताप सरनाईकांचे जुने सहकारी राजन विचारे (Rajan Vichare) यांनी त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. राजन विचारे यांनी प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांना जाहीरपणेच पत्र लिहले आहे. या पत्रात राजन विचारे यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर सडकून टीका केली आहे.
या पत्रात राजन विचारे यांनी प्रताप सरनाईक यांच्या राजकीय कारकीर्दीचा इतिहास खणून काढला आहे. त्यांनी म्हटले आहे की, प्रताप सरनाईक अत्यंत साध्या घरात तुमचा जन्म झाला. तुमचे लहानपण डोंबिवलीत गेलं. तुमचे "धंदे" मी देखील जवळून पाहिले आहेत. त्यानंतर तुम्ही ठाण्यात आलात. त्यानंतर तुम्ही त्या काळात काँग्रेस पक्षातून राजकारणाला सुरूवात केलीत. मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिरकाव केलात. तिथेही रत्नजडीत घड्याळांची भेट देऊन वरिष्ठ नेत्यांशी सलगी करण्याचे तुमचे 'प्रताप' सर्वश्रुत आहेत. पुढे राष्ट्रवादीत मित्राशी 'संघर्ष' वाढ़ल्याने परस्पर शिवसेनेशी सवतासुभा मांडून आमदारकीची झुल पांघरलीत. नगरसेवक ते आमदार बनल्यानंतर तुम्ही तुमचं अख्ख कुटुंबही राजकारणात सक्रिय केले, असे राजन विचारे यांनी पत्रात म्हटले आहे.
Pratap Sarnaik: आता ज्यांच्यासोबत आहात तेच तीन महिने तुमच्या मागे लागले होते, तुम्हाला कोणी त्रास दिला हे कुटुंबाला विचारा: राजन विचारे
ठाकरे नावामुळेच शिवसेनेत मोठे झालात. त्यानंतर, अचानक उपरती झाल्याचे गद्दार गटामध्ये जाऊन तुम्ही तुमची निष्ठा दाखवलीत. असो... दरम्यानच्या काळात स्थानिक नेत्यांचा विरोध असताना देखील हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी विश्वास तुमच्यावर ठेवला, तिकीट दिले आणि भरभरून प्रेमही दिले. त्यानंतर पक्षाच्या नावावर तुम्ही अफाट "माया" देखील कमावलीत. ती एवढी की सध्या ज्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसले आहात तेच तुमच्या मागे तीन महिने लागले होते, असे राजन विचारे यांनी पत्रात म्हटले आहे.
तुमच्या त्याच नेत्याच्या नगरविकास मंत्रालयाने त्यावेळी लोकायुक्तांकरवी तुमच्या चौकशीचे आदेश जारी केले होते. एमएमआरडीएतील टॉप्स सिक्युरिटी घोटाळा, एमएसईल जमीन घोटाळा अशा तुमच्या अनेक घोटाळ्यांमुळे ईडीचा ससेमिरा तुमच्या मागे लागला होता. त्यामुळे तुमचे काळे धंदे हे सर्वसामान्य जनतेला चांगलेच माहीत आहेत. ज्यांनी आपल्याला मोठं केले त्यांना तरी विसरू नये असे मोठी माणसे नेहमी सांगत असतात. तुम्हाला विरोध असताना देखील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी एकदा मला सांगितले. कोणत्याही परिस्थितीत प्रताप निवडून आला पाहिजे, त्यांनतर ठाण्यातील शिवसैनिकांनी जीवाचे रान करून, छातीवर दगड ठेवून तुम्हाला निवडून आणले. सरनाईकजी तुमच्या घरातील सदस्यांना फक्त एकदा विचारा नगरसेवक असताना त्यांना कोणी त्रास दिला. याचे उत्तर तुम्हाला घरातच मिळेल. कारण ती माणसे सध्या तुमच्या आजुबाजूलाच आहेत, हे मात्र लक्षात ठेवा. आणि महत्वाचे म्हणजे "भूतकालः न विस्मर्तव्यः" याप्रमाणे मागील वेळ विसरू नका, असा सल्लाही राजन विचारे यांनी दिला.
आणखी वाचा