Raj Thackeray-Uddhav Thackeray: मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान दिल्लीत सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इकडे काय बोलतात त्याला महत्त्व नाही. वर दोघेजण बसलेत त्यांच्या मनात वेगळेच आहे. आता मराठी म्हणून सगळ्यांनी एकत्र यावेच लागेल. आपापसातले मतभेद, भांडणं मिटवा. महाराष्ट्रापुढे काहीही नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपलाही एक्सपायरी डेट आहे, असं ठाकरे बंधूंनी सामनाच्या मुलाखतीत म्हटलं आहे. खासदार संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी ठाकरे बंधूंच्या घेतलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध आज प्रदर्शित झाला. यामध्ये ठाकरे बंधूंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. (Raj Thackeray-Uddhav Thackeray)

Continues below advertisement

मुंबईचा लचका तोडला जाईल, महाराष्ट्र तुटेल, विदर्भ वेगळा होईल हे आपण सातत्याने म्हणतो, पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवा गर्जना केली की, सूर्य-चंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही. तुम्ही याच्यावर विश्वास ठेवता का?, असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला. यावर त्यांच्या हातातच मुळात काही नाही. इच्छा चांगली आहे, पण जे 'वरून', म्हणजे दिल्लीतून सांगितलं जाणार तेच त्यांना ऐकावं लागणार. 'वरून' सांगितलं की ही जमीन अदानीला द्यायची, तर त्यांच्यासमोर सही करण्याशिवाय पर्यायच नसतो, असं उत्तर राज ठाकरेंनी दिले. तसेच वरच्यांच्या मनात काय आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. इकडच्या लोकांच्या मनात काय आहे हा विषयच येत नाही. Obey the Order एवढीच फक्त गोष्ट यांच्या हातात आहे. त्यामुळे त्यांनी चंद्र-सूर्याचे कितीही दाखले दिले तरी वरती जे बसलेले दोघेजण (मोदी-शहा) आहेत त्यांच्या मनात काय आहे हे पहिल्यांदा आपल्याला कळणं गरजेचं आहे आणि ते कळतंय, असं राज ठाकरेंनी सांगितलं. (Shivsena UBT-MNS Yuti)

उद्धव ठाकरेंनी देखील यावर भाष्य केलं. मुळात मुंबई महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही, पण ज्या पद्धतीने मुंबईची संस्कृती मारली जातेय ते चिंताजनक आहे. कोणीही येतो आणि सांगतो या भागाची भाषा गुजराती आहे. आमच्यावर हिंदीची सक्ती करणार, म्हणजेच तुम्ही आमची सगळी अस्मिता व संस्कृती मारणार आणि केवळ नावालाच मुंबई महाराष्ट्रात ठेवणार. या गोष्टीला काही अर्थ नाही. राज आता जसं म्हणाले की, बस म्हटलं की बस आणि ऊठ म्हटलं की ऊठ मानणारी ही लोकं आहेत. यांच्यावर काय विश्वास ठेवायचा?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. मुंबईची जी लक्ष्मी आपण म्हणतो...ती कुठे गेली? कोणाकडे गेली?, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. यावर आपल्या मराठी माणसाच्या हातात नाहीये. मराठी माणूस हा कामगार, श्रमिक, लढवय्या होता. आज तो बाहेर गेला आणि संपूर्ण मुंबईची संपत्ती ही एका विशिष्ट वर्गाच्या हातात आहे, ती सातत्याने गुजरातला पळवण्याचा प्रयत्न होतोय. याचा अर्थ असा की, मुंबईत तुमचा जमिनीचा तुकडा तुमच्याकडे राहील, संपत्ती मात्र आमच्याकडे राहील, असं विधान संजय राऊतांनी केलं. (BMC Election 2026)

Continues below advertisement

राज ठाकरे काय म्हणाले? (Raj Thackeray-Uddhav Thackeray)

राज ठाकरे म्हणाले की, माझं यावर थोडंसं वेगळं मत आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की, आताची परिस्थिती तशी नाहीये. आता त्यांना मुंबईचा तुकडाही हवाय. हा विषय फक्त संपत्तीचा नाही, आपण जर का नीट बघितलं तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळीदेखील मुंबईतले जे अमराठी धनदांडगे होते तेच मुंबई गुजरातला द्या, अशी मागणी करत होते. आजही तीच परिस्थिती आहे आणि त्यावेळेला समजा पाच लोक असतील तर ती आज पाचशे लों झाली आहेत आणि ज्याप्रकारे मुंबईतल्या गोष्टी केंद्र व राज्यामार्फत केल्या जात आहेत किंवा करून घेतल्या जात आहेत तो धोका मला सर्वाधिक वाटतोय, असं राज ठाकरे म्हणाले. जो याआधी इतका कधीही नव्हता. आता जो स्ट्रटॅजिकली मुंबई तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, ज्याला आपण एमएमआर रिजन म्हणतो. या एमएमआर रिजनमध्ये कोणत्या प्रकारच्या गोष्टी सुरू आहेत पाहा, वाढवण बंदर...वाढवण बंदराला लागून विमानतळ...विमानतळ तुम्ही कशासाठी आणताय?, त्या दिवशी माझ्या एका भाषणात मी असं म्हटलं होतं की, मुंबईनंतर नवी मुंबईत जे विमानतळ झालंय, मुंबईतल्या हक्काच्या विमानतळावरील सगळा कार्गो तिथे नवी मुंबईतल्या विमानतळावर हलवतील. आता सुरुवात झालेलीच आहे, पुढे हळूहळू मुंबईतील डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल विमानतळ नवी मुंबईत हलवणार. आताचं मुंबईतलं विमानतळ अदानीकडे आहेच. आताच्या विमानतळाचं क्षेत्रफळ तुम्ही पाहिलंत तर त्यात कमीत कमी 50 शिवाजी पार्क मैदाने बसतील इतपं ते मोठं आहे. म्हणजे उद्या हे सगळं डोमेस्टिक, इंटरनॅशनल विमानतळ नवी मुंबईला हलवायचं आणि इथल्या विमानतळाचा सगळा भाग विकायला काढायचा हाच त्यांचा प्लॅन आहे, असा दावा राज ठाकरेंनी केला. 

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Raj Thackeray : मुंबई गुजरातला जोडण्याचं काम सुरू, मुंबईत मराठी टक्का मोठा, मतदानासाठी त्यांनी बाहेर पडावं; राज ठाकरेंचा वादळी 'कट्टा'