MNS & Thackeray Camp alliance: राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. 5 जुलै रौजी मुंबईतील गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानापर्यंत काढण्यात येणाऱ्या मोर्चात हे दोन्ही नेते सहभागी होणार आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शुक्रवारी सकाळी सोशल मीडियावरुन यासंदर्भातील घोषणा केली होती. प्रमुख नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मनसे आणि ठाकरे गट (Thackeray Camp) यांच्या केडरमध्येही एकत्र येण्याच्या हालचाली सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई यांनी शुक्रवारी दादरमध्ये एकमेकांची भेट घेतील.

राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्कमधील निवासस्थानापासून काही अंतरावरच असलेल्या जिप्सी या रेस्टॉरंटमध्ये संदीप देशपांडे आणि वरुण सरदेसाई यांची भेट झाली. जिप्सी रेस्टॉरंटच्या बाहेरच्या भागात असलेल्या बाकड्यांवर बसून हे दोन्ही नेते गप्पा मारत होते. साहजिकच प्रसारमाध्यमांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. यावेळी त्यांच्याशी संवाद साधला असता वरुण सरदेसाई यांनी म्हटले की, राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. एकाच विषयासाठी दोन मोर्चे काढण्यापेक्षा एकत्रित मोर्चा काढावा, असा निर्णय दोन्ही नेत्यांनी घेतला. हा मोर्चा भव्यदिव्य असला पाहिजे. यासाठी विद्यार्थी, पालक, कलाकार आणि सामान्य नागरिकांना कशाप्रकारे आवाहन करायचे, यासाठी आमची आजची भेट आहे. आम्ही प्रत्येकवेळी कॅमेऱ्यासमोर भेटतो असे नाही. आम्ही एरवीही एकमेकांना भेटत असतो. राजकारणापलीकडे जाऊन काहीतरी करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत. 5 जुलैच्या मोर्चाविरोधात काही मराठी द्वेष्टे कोर्टात जाण्याची भाषा करत आहेत. त्यांनी आम्ही मराठी जनतेची ताकद दाखवून देऊ. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही आपापसातील मतभेद दूर ठेवण्यासाठी तयार आहोत, असे सांगितले होते. उद्धव ठाकरे यांनीही त्या वक्तव्यानंतर मनसेला लगेच टाळी दिली होती. हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत, असे वरुण सरदेसाई यांनी सांगितले. 

यानंतर संदीप देशपांडे यांना प्रतिक्रिया विचारले असता म्हटले की, आम्ही 5 जुलैच्या मोर्चाच्या नियोजनाची प्राथमिक चर्चा करण्यासाठी भेटलो आहोत. बाकी राजकीय युतीचा निर्णय त्याचा निर्णय दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. मुंबईत मोर्चा काढायला कोणीही बंदी घालू शकत नाही. मराठी माणसं एकत्र आलं तर कोणाला आवडणार नाही, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले. संदीप देशपांडे आणि वरुण सरदेसाई यांच्या या भेटीनंतर आता मनसे आणि ठाकरे गटात स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये मनोमीलन होण्याच्या प्रक्रियेला आणखी वेग आला आहे.

आणखी वाचा

ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची पोस्ट अमित शाहांना टॅग केली, आशिष शेलार म्हणाले, 'संजय राऊतांची औकाद नाही'