रत्नागिरी : कोकणातील सर्वात हाय व्होल्टेज लढत असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग (Ratnagiri-sindhudurg) मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही लोकसभा निवडणुकांतील आपल्या प्रचारसभांची सुरुवातच या मतदारसंघातून केली. तळकोकणातील कणकवलीत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) नारायण राणेंसाठी (Narayan Rane) जाहीर सभा घेतली. आपल्या सभेतून त्यांनी विकास आणि कोकणातील पर्यटनाच्या मुद्द्यावर भाष्य केले. मात्र, राज ठाकरेंच्या भाषणाकडे लक्ष ठेऊन असलेल्यांची काही प्रमाणात निराशाच झाल्याचं दिसून आलं. दरम्यान, राज यांनी आपल्या भाषणापूर्वी व्यासपीठावर शेजारीच बसलेल्या नितेश राणेंचा हात हाती घेऊन पाहिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


राज ठाकरेंनी गुढी पाडवा मेळाव्यातील जाहीर सभेतून महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता.त्यानंतर, पहिल्यांदाच निवडणुकांच्या अनुषंगाने राज ठाकरेंची तोफ धडाडली. शिवतीर्थावरील गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणानंतर जाहीर सभा घेण्याचा मनोदय नव्हता. पण नारायणराव राणेंशी असलेला स्नेह आणि आग्रहामुळे त्यांना नाही म्हणून शकलो नाही. कारण ते माझे जुने सहकारी आणि मित्र आहेत, असे म्हणत राज यांनी कोकणातील सभेला सुरुवात केली. त्यानंतर,येथील पर्यटनावर भाष्य करताना,जितकं आपलं तळकोकण देखणं आहे तितकीच इथली जनताही सुजाण आहे. कारण महाराष्ट्र राज्याला 9 भारतरत्न आहेत, त्यापैकी 7 भारतरत्न एकट्या कोकणातून येतात. माझी राजकीय वाटचाल आडेवेढे घेणारी नसते... सरळ आणि सुस्पष्ट असते. एखादी भूमिका पटली तर मी समर्थन करतो आणि नाही पटली तर टोकाचा विरोध करतो, असे स्पष्टीकरण राज यांनी त्यांच्या बदलत्या भूमिकेवर दिले. 


राज ठाकरेंची कोकणातील सभा तसं पाहिलं तर प्लेन झाली. राज यांनी ना कोणावर बोचरी टीका केली, ना हल्लाबोल. त्यामुळे, या सभेनंतर त्यांच्या भाषणाची म्हणावी तेवढी चर्चा झाली नाही. मात्र, सोशल मीडियावर राज ठाकरे आणि आमदार नितेश राणे यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये, राज ठाकरे नितेश राणेंचा हात हातात घेऊन पाहात आहेत. मात्र, राज ठाकरे राणेंचा हात हाती घेऊन नेमकं काय पाहात आहेत, असा प्रश्न नेटीझन्सला पडला आहे.


अगोदर राणेंनी केलं भाषण


नारायण राणेंच्या प्रचारासाठी आलेला राज ठाकरे व्यासपीठावर मधोमध बसले होते. तर, राज यंच्या उजव्या हाताला नारायण राणे व डाव्या हाताला नितेश राणे बसले होते. राज यांच्या भाषणापूर्वी नारायण राणेंचं भाषण झालं. त्यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. राज ठाकरेंसमोर त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तर, राज यांनी नारायण राणेंचं संपूर्ण भाषण ऐकलं. यावेळी, 9 वाजून गेले होते. त्यामुळे, राज ठाकरेंच्या नावाची घोषणा झाल्यानंतर भाषणासाठी खुर्चीवरुन उठलेल्या राज यांनी बाजुच्याच खुर्चीवर असलेल्या नितेश राणेंचा हात हाती घेतला. 


म्हणू राज ठाकरेंनी हात पाहिला


नितेश राणेंच्या हातातील घड्याळ पाहून त्यांनी वेळ पाहिला. रात्री 10 वाजता जाहीर सभांना बंदी आहे, त्यामुळे, 10 वाजण्यापूर्वी आपलं भाषण संपवावं लागणार आहे. याची माहिती असल्यानेच राज यांनी नितेश राणेंच्या हातातील घड्याळातून वेळ पाहिली अन् आपल्या सभेला सुरुवात केली. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून राज ठाकरेंनी नेमकं हातात काय पाहिलं याची चर्चा रंगली आहे.  


हेही वाचा


''महिलांची डोकी फुटली तेव्हा निषेधसुद्धा नाही, पण बायको उमेदवार असल्याने मनोज जरांगेंची भेट''; ओमराजेंचा घणाघात