पुणे : महाराष्ट्रातील अस्थिर राजकारणावरुन राज ठाकरेंनी (Raj Thackeray) प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. पंतप्रधान मोदींनी (PM Modi) अजित पवारांसह राष्ट्रवादीवर 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते आणि आठवड्याभरातच अजित पवार भाजपशी हात मिळवणी करुन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतात, या सर्व स्थितीवरुन राज ठाकरेंनी पत्रकारांना देखील खडसावलं आहे. राज ठाकरे आज (19 ऑगस्ट) पुण्यात पत्रकारांच्या गौरव समारंभात उपस्थित होते, त्यावेळी त्यांनी अनेक मुद्दयावर भाष्य केलं आहे.  


'अजित पवार सत्तेत गेले याची चीड यायला हवी'


पंतप्रधान आठवडाभरपूर्वी काहीतरी बोलतात, त्याचे पडसाद उमटतात आणि काही दिवसांत अजित पवार थेट शपथविधी घेतात, त्यानंतर पत्रकार परिषदेत ते वाट्टेल ते बोलतात अन् पत्रकार तिथं हसतात, ही काय पत्रकारिता आहे का? असं म्हणत राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत पत्रकारांनाही चांगलंच खडसावलं आहे. मुळात अजित पवार सत्तेत गेले याची चीड यायला हवी, असं म्हणत राज ठाकरेंनी पत्रकारांवरही रोष व्यक्त केला. "पूर्वी असं काही घडलं की पत्रकार फटकारुन काढायचे, सळो की पळो करायचे, पण आता असं काही घडत नाही. उगाच फडतूस ब्रेकिंग न्यूज चालवतात. काय तर राज ठाकरे घरातून निघाले." असं म्हणत राज ठाकरेंनी  चिमटाही काढला. 


सभांना गर्दी होते, पण मतं मिळत नाहीत?


राज ठाकरे यांनी पत्रकारांकडून दिल्या जाणाऱ्या चुकीच्या बातम्यांवरही भाष्य केलं. तसेच त्यांनी पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत चिंताही व्यक्त केली. यावेळी राज ठाकरे म्हणाले, “हल्ला कुणावरही होऊ नये. पण हल्ला झाल्यावर जसा पत्रकारांना राग येतो, तसा आम्हालाही (राजकीय व्यक्तींना) राग येतो" असं राज ठाकरे म्हणाले. पुढे ते म्हणाले, "पत्रकार मला म्हणतात, तुमच्या सभांना गर्दी होते, पण मतं मिळत नाहीत. आता तुम्ही पत्रकार आहात, म्हणजे तुम्ही काय आमचे वाभाडे काढणार का? राज ठाकरे आहे मी, हे मी खपवून घेणार नाही. मी यावर व्यक्त होणारच."


"विनाकारण खोट्या बातम्या देणं चुकीचं"


पत्रकारांना उद्देशून राज ठाकरे पुढे म्हणाले, “तुमचं काम आमचे डोळे उघडणं आहे. तुमचं काम आम्हाला चिमटे काढणं आहे. तुमचं काम प्रबोधन करणं आहे. जर समजा आम्ही काही चुकीची पावलं टाकत असू तर आम्हाला सुधरवणं, हे तुमचं काम आहे. विनाकारण खोट्या बातम्या देणं चुकीचं आहे. नको त्या बातम्या करणाऱ्या पत्रकारांवर तुमची संघटना काय कारवाई करणार आहे का? हे सांगावं. बाकी इतर बाबतीत राज ठाकरे तुमच्यासोबत आहे.”


हेही वाचा:


अविनाश भोसले ते अनिरुद्ध देशपांडे, शरद पवारांच्या सात निकटवर्तींयावर ईडीची धाड