मुंबई: मराठा आरक्षणासाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांचे गेल्या 3 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. जरांगे पाटील यांच्यासह हजारो मराठा बांधव मुंबईच्या रस्त्यावर आंदोलन करताना, आझाद मैदानात घोषणाबाजी करताना दिसत आहेत. तर, या आंदोलनावर काहीही राजकीय किनारही पाहायला मिळत आहे. त्यातच, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या अनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी, हे सगळे प्रश्न तुम्ही एकनाथ शिंदेंना विचारा, असे राज ठाकरेंनी म्हटले. आता, राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) या बोचऱ्या टीकेवर एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) उत्तर दिलं आहे. तर, शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावरुन त्यांच्यावरही टीका केलीय.
मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत आणि मराठा आरक्षणाबाबत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारा असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं, त्यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिल आहे. त्यांनी पूर्ण माहिती घेतली पाहिजे होती, आम्ही आधी दिलेलं आरक्षण कोणामुळे गेलं याबाबतची माहिती त्यांनी घ्यायला हवी होती. हायकोर्टामध्ये आम्ही टिकवलेलं आरक्षण ते सुप्रीम कोर्टात का टिकवू शकले नाहीत असं त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यांना त्यांनी विचारायला हवं होतं, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली. तसेच, मी जे काही बोलतोय ते काही लोकांना माहित पडावं यासाठीच बोलतोय. आम्ही जे 10 टक्के आरक्षण दिलं ते टिकलं आहे. तर, शिंदे कमिटी गठीत करुन अनेक पुरावे शोधून कुणबी नोंदीही शोधल्या आहेत. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणावर मिळाली आणि याचा लाभ मराठा समाज घेतोय, असा पलटवार एकनाथ शिंदेंनी केला.
शरद पवारांच्या प्रतिक्रियेवरही शिंदेंचा पलटवार
शरद पवारांनी मराठा आरक्षणावर भाष्य करत तामिळनाडूत 72% पर्यंत आरक्षण मर्यादा वाढवल्याचे म्हटले. तसंच आपल्या राज्यात सुद्धा ते शक्य आहे असेही सांगितलं. त्यावर, प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार हे खूप सीनियर लीडर आहेत, ते परिपक्व नेते आहेत, त्यांनी मुख्यमंत्रिपद भोगलं आहे. केंद्रामध्ये सुद्धा केंद्रीयमंत्री म्हणून काम केलेलं आहे. मग असं असताना इतक्या वर्षात त्यांनी हा विचार का केला नाही, असा प्रश्न शिंदेंनी शरद पवारांना केला आहे. तसेच त्यांनी हा विचार करुन तो निर्णय यापूर्वीच घ्यायला पाहिजे होता. यापूर्वी देखील काँग्रेसचे सरकार होते हे आपल्याला माहित आहे. राज्यात आणि केंद्रात सुद्धा ते होते. मग तेव्हाच हा निर्णय का घेतला नाही. आम्ही जे आरक्षण दिलेलं आहे, त्याच्यावर आरोप करणे आणि टीका करणे किंवा कोणाच्या तरी कोर्टात चेंडू टाकने हे योग्य नाही. त्यांच्याकडे सुद्धा इतक्या वर्षांचा राजकीय अनुभव आहे. मराठा समाज आणि इतर कोणत्याही समाजाच्या बाबतीत विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांनी मिळून निर्णय घ्यायला हवा. मात्र, इकडे वेगळी भूमिका आणि तिकडे वेगळी भूमिका असं कोणीही करता कामा नये असा पलटवार एकनाथ शिंदेंनी केला.
हेही वाचा
Video: मराठा आंदोलक आक्रमक, घोषणाबाजी करत सुप्रिया सुळेंना विचारला जाब, महिला नेत्याला घेराव