पुणे: भारत-पाकिस्तान युद्धासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अलीकडेच घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांच्यावर प्रेम करणारे बुचकळ्यात पडले असून, अनेकांना त्यामुळे दुःख झाल्याचं मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात एबीपी माझाशी बोलत होते. दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये केलेल्या हल्ल्यात (Pahalgam Terror Attack) 27 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यावर भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवून पाकिस्तानात घुसून दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. त्यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांवर ड्रोन हल्ले केले होते. त्यावेळी युद्ध हा पर्याय नाही, अमेरिकेने जसे दहशतवाद्यांना शोधून ठार केलं, तसं दहशतवाद्यांना संपवा, युद्धाऐवजी देशातील घुसखोरांना शोधून काढा, असं राज ठाकरे म्हणाले होते. 

त्यावर प्रकाश महाजन म्हणाले,  राज ठाकरे यांनी भारत-पाकिस्तान युद्धासंदर्भात जी भूमिका घेतली, त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणारे बुचकळ्यात पडले आहेत.  "राजसाहेब हे नेहमीच राष्ट्रवादी विचारसरणीचे नेते आहेत. मात्र अलिकडे त्यांनी युद्ध नको अशी भूमिका घेतली. ही भूमिका ऐकून त्यांच्यावर प्रेम करणारे समर्थक गोंधळले आणि काहींना तर यातून मानसिक दुःखही झालं", असे प्रकाश महाजन यांनी म्हटले. प्रकाश महाजन यांच्या या वक्तव्यावर आता राज ठाकरे किंवा मनसेचे इतर नेते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे  लागेल. 

Raj Thackeray: मॉकड्रील किंवा युद्ध हा पर्याय नव्हे: राज ठाकरे

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील अतिरेक्यांना शोधून काढण्यात केंद्र सरकारला अद्याप यश आलेले नाही. दहशतवाद्यांच्या पुढच्या पिढ्यांनाही लक्षात राहील, असा धडा शिकवणे गरजेचे होते. अशावेळी पाकिस्तानशी युद्ध करणे किंवा मॉकड्रील आणि एअरस्ट्राईक या गोष्टी फायद्याच्या नाहीत. पाकिस्तान हा अगोदरच बर्बाद झालेला देश आहे. त्यांना आणखी काय बर्बाद करणार? अमेरिकेत दहशतवाद्यांनी ट्विन टॉवर पाडले आणि पँटागॉनवर हल्ला केला तेव्हा अमेरिकेन त्या दहशतवाद्यांना शोधून ठार मारले. त्यामुळे दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे प्रत्युत्तर नसते. त्यामुळे देशात मॉकड्रील करण्याऐवजी कोम्बिंग ऑपरेशन करा. देशातील आपलेच प्रश्न संपत नाही, अशा परिस्थितीत युद्धाला सामोरे जाणे योग्य गोष्ट नाही, असे परखड मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले होते.

Uddhav Thackeray & Raj Thackeray: राज-उद्धव एकत्र येणार का? 

याच वेळी त्यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि मनसे यांच्यात युती होण्याबाबत एक महत्त्वाचा खुलासाही केला. "राजसाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यात युती होण्यास संजय राऊतच अडथळा आहेत," असा थेट आरोप प्रकाश महाजन यांनी केला. "संजय राऊत वारंवार अशा प्रकारची वक्तव्यं करतात की जी युतीच्या मार्गात अडथळा ठरतात," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

महाजन यांनी राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाविषयी बोलताना सांगितलं, "आज जरी काही लोक त्यांचं हिंदुत्व नाकारत असले, तरी भविष्यात तेच हिंदुत्व लोक उचलून धरतील."

आणखी वाचा

राज ठाकरे काय म्हणतात याला महत्त्व नाही; ऑपरेशन सिंदूरवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

राज ठाकरे म्हणजे मुक्त विद्यापीठ, कोणीही जाऊन पदवी घेऊ शकते, त्यांनी अनैतिक संबंध ठेवू नयेत : संजय राऊत