नवी दिल्ली : भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर (Operation sindoor) राबवत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास पाकिस्तानच्या हद्दीत घुसून 9 दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. त्यामुळे, पाकिस्तानला चांगलीच धडकी भरली असून पाकिस्तानी नेते वल्गना करताना दिसून येतात. या हल्ल्यानंतर देशभरातून समाधान आणि आनंद व्यक्त होत आहे. सरकार आणि भारतीय सैन्य दलाच्या पाठिशी असल्याचं सर्वपक्षीय नेते सांगत आहेत. तसेच, भारतीय सैन्य दलाचे अभिनंदनही केलं जात आहे. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी युद्ध हे दहशतवादी हल्ल्ल्याचं उत्तर नसल्याचे सांगत मोदी सरकारवर टीकेचे बाण सोडले. आता, राज ठाकरेंच्या वक्तव्याला महत्त्व नाही, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ऑपरेशन सिंदूरवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
ऑपरेशन सिंदूरसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानतो. त्यांनी या घटनेनंतर स्पष्टपणे सांगितलं होत की याचं उत्तर दिलं जाईल. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने ताकदवर उत्तर दिलं आहे. विशेषता मुंबईत ज्यांनी हल्ला केला ते हाफिज आणि डेव्हिडचे अड्डे देखील नष्ट करण्यात आले आहेत. हा नवीन भारत अशा प्रकारे हल्ले सहन करणार नाही, हे पुन्हा एखादा भारताने दाखवून दिलं आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ऑपरेशन सिंदूरवर पहिली प्रतिक्रिया दिली.
जगभरातील विविध देश आपल्या पाठिशी
भारताने जे ऑपरेशन सिंदूर राबवलं आहे, त्या संदर्भात लष्कराचे मी आभार आणि अभिनंदन करतो. पाकिस्तानात दहशतवाद्यांचे 9 अड्डे उध्वस्त करण्याचे काम सेनेने केले. ज्या प्रकारे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत होता, आणि विशेषता पहलगाममध्ये आमच्या बांधवांना मारण्यात आलं, त्याचा संताप संपूर्ण भारतात होत आहे. भारताने गेल्या 14 दिवसात सगळ्या देशाची संपर्क करून पाकिस्तान कसा दोषी आहे ते सांगितले, त्याची माहिती दिली. त्यामुळेच, विविध देश आपल्या पाठीशी आहेत, असेही फडणवीसांनी म्हटले.
दरम्यान, भाजप पक्षाने कायमच राष्ट्र प्रथम या भूमिकेतूनच काम केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा साऱ्या जगाला ते दाखवून दिलं आहे. आपण जर पाहीलं तर उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत अड्डे उध्वस्त करण्याचं काम लष्कराने केलं आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
राज ठाकरेंच्या म्हणण्याला महत्त्व नाही
राज ठाकरे काय म्हणतायत याला महत्त्व नाही. संपूर्ण भारत जनता पाठीशी उभी आहे आणि झालेल्या कारवाईचे कौतुक करत आहेत. संपूर्ण जग देखील आपल्या पाठीशी उभे आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
हल्ल्यानंतर काय म्हणाले राज ठाकरे
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील अतिरेक्यांना शोधून काढण्यात केंद्र सरकारला अद्याप यश आलेले नाही. दहशतवाद्यांच्या पुढच्या पिढ्यांनाही लक्षात राहील, असा धडा शिकवणे गरजेचे होते. अशावेळी पाकिस्तानशी युद्ध करणे किंवा मॉकड्रील आणि एअरस्ट्राईक या गोष्टी फायद्याच्या नाहीत. पाकिस्तान हा अगोदरच बर्बाद झालेला देश आहे. त्यांना आणखी काय बर्बाद करणार? अमेरिकेत दहशतवाद्यांनी ट्विन टॉवर पाडले आणि पँटागॉनवर हल्ला केला तेव्हा अमेरिकेन त्या दहशतवाद्यांना शोधून ठार मारले. त्यामुळे दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे प्रत्युत्तर नसते. त्यामुळे देशात मॉकड्रील करण्याऐवजी कोम्बिंग ऑपरेशन करा. देशातील आपलेच प्रश्न संपत नाही, अशा परिस्थितीत युद्धाला सामोरे जाणे योग्य गोष्ट नाही, असे परखड मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.