Raj Thackeray Thane Court: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) 2008 मधील कल्याण रेल्वे स्थानकावरील मारहाण प्रकरणी आज ठाणे सत्र न्यायालयात (Thane Court) हजर झाले. सुनावणीदरम्यान न्यायालयात एक असा क्षण निर्माण झाला की, संपूर्ण दालनाचे लक्ष राज ठाकरे यांच्याकडे गेल्याचे पाहायला मिळाले.
Raj Thackeray Thane Court: स्वरराज श्रीकांत ठाकरे… नाव पुकारताच राज ठाकरेंची प्रतिक्रिया
न्यायाधीश कुलकर्णी यांच्या दालनात आरोपींची नावे एकामागोमाग एक पुकारली जात होती. त्याच यादीत ‘स्वरराज श्रीकांत ठाकरे’ हे नाव आले आणि कोर्टात क्षणभर कुजबुज वाढली. नाव पुकारल्यानंतर राज ठाकरे यांनी शांतपणे मान हलवत ‘मी हाजीर आहे’ असे म्हटले. यानंतर न्यायाधीशांनी थेट विचारले “गुन्हा कबूल आहे का?”, यावर राज ठाकरे यांनी उत्तर दिले की, “हा गुन्हा मला कबूल नाही.”
Raj Thackeray Thane Court: न्यायाधीशांनी दिली सवलत; आता पुन्हा येण्याची गरज नाही
यानंतर न्यायाधीश कुलकर्णी म्हणाले की, 'हे जुनं प्रकरण आहे. एक महिन्याची वेळ देतो. तुम्ही सहकार्य करा… आता तुम्हाला पुन्हा न्यायालयात येण्याची गरज नाही'.” यानुसार पुढील सुनावणीची तारीख 16 डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे.
Raj Thackeray Thane Court: काय म्हणाले राज ठाकरेंचे वकील?
राज ठाकरे यांचे वकील अॅड. ओंकार राजूरकर यांनी सांगितले की, आज न्यायालयाने विचारले की गुन्हा कबूल आहे का? राज ठाकरेंनी स्पष्ट सांगितले की गुन्हा कबूल नाही. न्यायालयाने सांगितले की एका महिन्यात केस संपेल, सहकार्य करा. राज ठाकरे पूर्ण सहकार्य करणार आहेत. आजच्या तारखेपासून पुढे त्यांना कोर्टात हजर राहण्याची गरज नाही, असे त्यांनी म्हटले.
Raj Thackeray Thane Court: नेमके प्रकरण काय आहे?
2008 मध्ये रेल्वे भरतीदरम्यान कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांवर मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. या मारहाणीमध्ये रेल्वेचे मोठे नुकसानही झाले. या घटनांनंतर मनसेप्रमुख राज ठाकरे व आणखी सात कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. त्यावेळी राज ठाकरे यांनी 'मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्या', असा मुद्दा मांडल्याने वातावरण तापले होते. त्यांच्या वक्तव्यामुळे हिंसाचाराला उत्तेजन मिळाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. प्रकरणाची सुनावणी सुरुवातीला कल्याण न्यायालयात सुरू होती. नंतर ते ठाणे रेल्वे न्यायालयात वर्ग करण्यात आले आहे. आरोपी वारंवार अनुपस्थित राहत असल्याने न्यायालयाने अटक वॉरंटही बजावले होते. त्यानंतर राज ठाकरे यांच्या वकिलांनी अर्ज देऊन वॉरंट रद्द करून घेतले होते. आजच्या सुनावणीनंतर प्रकरण एका निर्णायक टप्प्याकडे जात असून न्यायालयाने दिलेल्या एका महिन्याच्या मुदतीत प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणात न्यायालय काय निर्णय देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा