Raj Thackeray and Uddhav Thackeray: हिंदी सक्तीच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे तब्बल 20 वर्षांनी एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री जात त्यांना शुभेच्छा दिल्या. अनेक वर्षानंतर राज ठाकरे मातोश्रीवर आल्याने उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान, राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर गेल्यानंतर आता उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी कधी जाणार? याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
दरवर्षी राज ठाकरेंकडे गणेशोत्सवात गणेशाचे मोठ्या थाटामाटात आगमन होते. अनेकजण राजकीय नेते आणि इतर क्षेत्रातील मान्यवर राज ठाकरेंच्या निवासस्थानी श्रीगणेश दर्शनासाठी जातात. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज ठाकरे अनेक वर्षांनी मातोश्रीवर गेले होते. आता गणेशोत्सवाच्या निमित्ताने उद्धव ठाकरेही राज ठाकरेंच्या निवासस्थानी येणार अशी चर्चा सध्या दोन्ही ठाकरेंच्या अंतर्गत गोटात रंगली आहे. ही शक्यता एका बडे नेत्याने बोलून दाखवली आहे. मात्र अद्याप याबाबत ठाकरे गट आणि मनसेकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
उद्धव ठाकरे गणपतीच्या दर्शनाला शिवतीर्थावर जाणार?
यावर्षी राज ठाकरे यांच्या घरातील बाप्पाचं तिसरं वर्ष असून आतापर्यंत पहिल्याच दिवशी अनेक राजकीय नेत्यांनी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली होती. आतापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते राज ठाकरेंच्या घरी दर्शनासाठी आले आहेत. आता उद्धव ठाकरे येत्या गणेशोत्सवात राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थावर जाणार? का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
बाळा नांदगावकर घेणार फडणवीसांची भेट
दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवरील भेटीनंतर आता मनसे नेते बाळा नांदगांवकर मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. बाळा नांदगांवकर दोन दिवसांत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. त्यांनी भेटीकरिता मुख्यमंत्र्यांकडे वेळ देखील मागितली आहे. नाशिकमधील आदिवासी आश्रम शाळा आणि मुंबईतील कोळीबांधवांच्या प्रश्नांसंदर्भात ही भेट होणार असल्याचे समजते. मात्र, राज ठाकरेंच्या मातोश्री भेटीनंतर मनसे नेते फडणवीसांची भेट घेत असल्यानं या भेटीत काही राजकीय चर्चा होतेय का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. याआधीही ठाकरे बंधुंच्या एकीकरणाची चर्चा जोमात सुरु असताना अचानकच राज ठाकरेंनी एका हॉटेलमध्ये फडणवीसांची भेट घेतली होती. आता देखील राज ठाकरेंच्या मातोश्रीवारीनंतर तसेच ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा जोमात सुरु झाल्यानंतर पुन्हा एकदा मनसे-फडणवीस भेटीच्या बातमीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आणखी वाचा