मुंबई: राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मनसे (MNS) आणि शिवसेना ठाकरे गट (Shivsena UBT) यांच्या युतीच्या चर्चा रंगल्या होत्या, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या दोघांच्या वक्तव्याने दोन्ही नेते युतीसाठी सकारात्मक असल्याचं दिसून आलं होतं. मात्र, गेल्या काही दिवसात त्या चर्चा थंडावल्या आहेत. मात्र, यादरम्यान शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले. राज ठाकरे आणि मंत्री उदय सामंत यांची ही तिसरी भेट झाली आहे. महापालिकेच्या निवडणुकींसाठी राज ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यातच मनसेच्या युतीच्या चर्चा मागच्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात आहेत. उदय सामंत आणि राज ठाकरे यांच्या आजच्या भेटीमुळे पुन्हा भुवया उंचावल्या आहेत. राज ठाकरे आणि उदय सामंत यांच्यात बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली. राज ठाकरे यांनी स्वागताचा बुके अजूनही घेतला नसल्याची माहिती समोर आली आहे. ती चूक पुन्हा नको, आधी चर्चा मग बुके असा आजच्या बैठकीचा सूर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे, युतीबाबत गांभीर्याने चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. 

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी नुकतीच राज ठाकरे यांची भेट घेतली. उदय सामंत मनसे प्रमुख राज ठाकरे यांना भेटण्यासाठी त्यांच्या दादर येथील निवासस्थानी 'शिवतीर्थ' येथे पोहोचले. उदय सामंत आणि राज ठाकरे यांच्यातील ही अलिकडची तिसरी भेट आहे. सध्या तरी शिवसेना मंत्री आणि मनसे प्रमुख यांच्यातील भेटीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. दोघांमध्ये काय चर्चा झाली हेही कळू शकले नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत युती होण्याची चर्चा होती.  त्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये होत असलेल्या गाठीभेटी आणि चर्चा यामुळे आगामी निवडणुकीमध्ये काही मोठे बदल किंवा युती होणार का याबाबत देखील अनेक तर्क वितर्क राजकीय वर्तुळात लावले जात आहेत. 

राज-उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यात शिंदे अडथळा ठरतील का?

दरम्यान एकीकडे राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांच्या एकत्रित येण्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या. त्याबाबत दोघांनी  सकारात्मकता दाखवली होती. मात्र, त्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाकडून वाढलेल्या हालचाली, गाठीभेटी याचं सत्र आणि चर्चा यामुळे राज-उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यात शिंदे अडथळा ठरतील का? अशा चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू आहेत.