Shivsena & MNS seat sharing: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे गट यांच्यातील जागावाटपाच्या चर्चेचा वेग आला आहे. मुंबईतील बहुतांश प्रभागांमधील मनसे-ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Camp) जागावाटप पूर्ण झाले होते. मात्र, दादर, शिवडी, भांडूप आणि विक्रोळी परिसरातील काही प्रभागांवरुन जागावाटपाचे घोडे अडले होते. मात्र, सोमवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत शिवडी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 203, प्रभाग क्रमांक 204, प्रभाग क्रमांक 205 यांच्या जागावाटपाचा तिढा सुटला आहे. त्यानुसार शिवडीतील दोन प्रभाग हे ठाकरे गटासाठी आणि एक प्रभाग मनसेला (MNS) सोडण्यात आला आहे. या बैठकीसाठी मातोश्रीवर मनसेचे बाळा नांदगावकर, ठाकरे गटाचे सुधीर साळवी आणि खासदार अनिल देसाई हे उपस्थित होते. या सगळ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत चर्चा करुन शिवडीतील जागावाटपाचा तिढा सोडवला. (BMC Election 2026)
यानंतर आता मातोश्रीवर भांडूप, विक्रोळी, दादर आणि माहीम परिसरातील प्रभागांच्या जागावाटपाबाब चर्चा सुरु आहे. विक्रोळी आणि भांडुपमधील वॉर्ड क्रमांक 109, 110 114, 115 या चार जागांवर दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. तर दादर, माहीममधील वार्ड क्रमांक 192 , 194, 193 या तीन वॉर्डवर ठाकरे गट आणि मनसे दोघांनीही दावा सांगितला होता. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी विशाखा राऊत आणि अनिल देसाई मातोश्रीवर उपस्थित आहेत. तसेच आमदार सुनील राऊत, खासदार संजय दिना पाटील हेदेखील बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांच्याशी मातोश्रीवर चर्चा करत आहेत. आज दिवसभरात जागावाटप अंतिम करुन मनसे आणि ठाकरे गटाकडून युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यात अधिकृत युती जाहीर आज किंवा उद्या युती जाहीर होऊ शकते. युती जाहीर करण्यासाठी भव्य पत्रकार परिषद किंवा मेळावा घेण्याचे दोन्ही पक्षांचे नियोजन आहे. गोरेगाव नेस्को, बांगुर नगर मैदान गोरेगाव, वरळी डोम या तीन ठिकाणची चाचपणी युतीच्या भव्य मेळावा किंवा पत्रकार परिषदेसाठी दोन्ही पक्षांकडून केली जात आहे. आज या संदर्भातला अंतिम निर्णय होईल. मनसे-ठाकरे गटाची इतरही महानगरपालिकेच्या जागावाटपाची चर्चा सुद्धा अंतिम टप्प्यात आहे.
Bhandup Election: भांडूपमध्ये आमदार रमेश कोपरगावकर पत्नीच्या उमेदवारीसाठी आग्रही
भांडूपच्या वॅार्ड क्रमांक 114 वरून ठाकरे गट आणि मनसेमध्ये रस्सीखेच सुरु आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार रमेश कोरगावर हे आपल्या पत्नीच्या उमेदवारीसाठी येथून आग्रही आहेत. तर मनसे माजी नगरसेविका अनिषा माजगावकर यांना हा वॅार्ड सोडावा यासाठी आग्रही आहे. अनिषा माजगावकर 2012 मध्ये इथून नगरसेविका झाल्या होत्या, तर 2017 मध्ये रमेश कोरगावकर यांनी अनिषा माजगावकर यांचा पराभव केला होता. त्यामुळे वॉर्ड क्रमांक 114 कोणाला सुटणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आणखी वाचा
पुण्यात अजित पवार मोठा डाव टाकणार? सतेज पाटलांना फोन फिरवला, म्हणाले....