मुंबई: भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या गोळीबारामुळे देशाचं आणि राज्याचं लक्ष कल्याणकडे लागलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता राजकीय नेत्यांचे कल्याण (Kalyan tour) दौरे वाढताना दिसत आहेत. कारण माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे उद्या 8 फेब्रुवारीला कल्याण दौऱ्यावर जाण्याची चिन्हं आहेत. त्याचवेळी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे सुद्धा उद्याच कल्याण शहरात दाखल होणार असल्याची माहिती आहे. 


 उल्हासनगरमधील (Ulhasnagar) हिल लाईन पोलीस (Hill Line Police Station) गोळीबार प्रकरणी आरोपी गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) हे सध्या पोलीस कोठडीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हाध्यक्ष महेश गायकवाड यांच्यावर 2 फेब्रुवारीला रात्री पोलिस स्टेशनमध्ये फायरिंग केलं होतं.  गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड हे दोघेही कल्याणमधील कोळसेवाडी भागातील आहेत. त्याच भागातील वर्चस्व आणि राजकीय शत्रूत्वातून गोळीबार झाला होता. त्यानंतर आता राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोघेही याच कोळसेवाडी परिसरात येणार आहेत. त्यामुळे या दोघांच्या दौऱ्याला विशेष महत्व आहे. 


राज ठाकरे कल्याण दौऱ्यावर


दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे कल्याण शहर दौरा करणार  आहेत. राज ठाकरे हे गुरुवारी म्हणजे उद्या संध्याकाळी कल्याण शहरात दाखल होतील. तर परवा म्हणजे 9 फेब्रुवारी रोजी कल्याणमध्ये पदाधिकारी बैठक आणि पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. कल्याण शहरात झालेल्या गोळीबार आणि राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आखलेला हा दौरा अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातोय.


आदित्य ठाकरेही कल्याण दौरा करणार


त्याआधी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे देखील उद्या कल्याण दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. विशेषत: आदित्य ठाकरे हे कोळसेवाडी शाखेला भेट देऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. या ठिकाणी आदित्य ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील.  


गणपत गायकवाड यांच्या मुलाचाही शोध सुरु


दरम्यान, उल्हासनगर फायरिंग प्रकरणात गणपत गायकवाड यांच्या मुलालाही आरोपी करण्यात आलं आहे. याप्रकरणात  सहा आरोपी होते. हिल लाईन पोलीस स्टेशनमधील गोळीबार घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये गणपत गायकवाड यांच्या मुलाचाही समावेश दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे. गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांचे सुपुत्र वैभव गायकवाड (Vaibhav Gaikwad) आणि नागेश बडेकर (Nagesh Badekar) या आरोपीचा अजूनही पोलीस तपास घेत आहेत. तर या प्रकरणांमध्ये आज विकी गणात्रा याला ताब्यात घेण्यात आलं आहे


दरम्यान, ठाण्यातील कळवा पोलीस स्टेशनच्या जेलमध्ये आमदार गणपत गायकवाड यांना ठेवण्यात आलं आहे. त्यांची कळव्यातील पोलीस स्टेशन मधील जेलमध्येच वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.  


संबंधित बातम्या  


Ulhasnagar Firing : फायरिंगप्रकरणात मुलाचंही नाव, गणपत गायकवाडांचं जेलमध्ये अन्नत्याग, फरार विकी गणात्राला बेड्या