Radha Krishna Vikhe Patil: देशातील काँग्रेस सध्या दिशाहीन झाली असून पक्षाला नेतृत्व नाही. सध्या पक्षात अध्यक्ष पदासाठी जी सुंदोपसुंदी सुरू आहे, हे त्यामुळेच घडतंय. त्यामुळे राहुल गांधी यांनी भारत जोडो ऐवजी काँग्रेस छोडोचे सत्र पक्षात सुरु आहे.  त्याच्याकडे लक्ष द्यावे  आणि पक्षाचा विचार करायला हवा, असं महसूल पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत. सांगलीत लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दौऱ्यावर आले असता आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत असं म्हणाले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विश्व नेते सामर्थ्यवान व कर्तुत्वान, असे देशाला लाभलेले नेतृत्व आहे. देशाला मोदीच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे भाजपकडे सर्व पक्षातून मोठ्या प्रमाणात येण्यासाठी लोक इच्छुक आहेत, असे विखे म्हणाले आहेत.


राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रसार


राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रसार झाला आहे. तथापी अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला बाधित पशुधनाचा मृत्यू दर कमी ठेवण्यात यश आले आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत 800 पशुधन मृत्यूमुखी पडले आहे. सरकारने याबाबत अनेक उपाययोजना केल्या असून यामध्ये मोफत लसीकरण, मोफत औषधांचा पुरवठा असे निर्णय घेण्यात आले असून ज्या शेतकऱ्यांनी औषधापोटी खर्च केला असेल त्यांच्या खर्चाची परतफेड करण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. राज्यात एक हजार वेटरनरी डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्यातील ज्या 7 ते 8 हजार खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सेवा या काळात घेण्यात आल्या आहेत त्यांचा मानधनाचा प्रश्नही लवकरच निकाली काढण्यात येणार आहे, असे सांगून सांगली, कोल्हापूर महानगरपालिकांच्या क्षेत्रातील मोकाट जनावरांचे लसीकरण करण्यात येत असल्याबद्दल विखे पाटील यांनी यंत्रणांचे अभिनंदन केले. जिल्हा व तालुका स्तरावरील संबंधित सर्व यंत्रणांनी फिल्डवर उतरून काम करावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.


लसीकरणामुळे लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यात व मृत्यू दर कमी ठेवण्यात यश
     
सांगली जिल्ह्यात 3 लाख 24 हजार पशुधन असून 2 लाख 61 हजार 546 पशुधनाचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्यातील लसीकरणाची टक्केवारी 82 टक्के असून लम्पी चर्मरोगाने प्रभावीत क्षेत्रात केलेल्या लसीकरणाची टक्केवारी 94 टक्के आहे. मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्याने प्रादुर्भाव रोखण्यात व पशुधनाचा मृत्यू दर कमी ठेवण्यात यश आल्याचे  महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले आहेत.


पशुधनाच्या औषधोपचारासाठी औषधांची बँक तयार करा, त्याबद्दल शेतकऱ्यांना माहिती द्या. महिनाभर पुरेल इतका औषधांचा साठा या औषध बँकमध्ये उपलब्ध ठेवा. जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील साखर कारखान्यांची तात्काळ बैठक बोलवावी. ज्या जनावरांना लसीकरण झालेले नाही त्यांना प्रवेशबंदी करावी. शेतकरी अडचणीत सापडलेला असताना सर्व यंत्रणा व संबंधित घटकांनी शेतकऱ्याला मदतीची भूमिका ठेवावी. मुक जनावरांबाबत कोणतीही हयगय नको, असं मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले.