मुंबई : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी चीनच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना इशाऱ्याइशाऱ्यात लक्ष्य केलं आहे. त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात भारत-चीन सीमा वादाशी संबंधित काही बातम्यांची झलक दिसत आहे. या रिपोर्टद्वारे राहुल यांनी पंतप्रधानांवर हल्लाबोल केला आहे.
राहुल गांधी यांनी ट्विट करून लिहिलंय, की "मिस्टर 56" चीनला घाबरत आहे. चीनच्या मुद्द्यावर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर राहुल यांनी टीका केलीय.
अलीकडेच, राहुल गांधींनी एक बातमीची हेडलाईन शेअर केली, ज्यात चीनने लडाखजवळ शस्त्रे तैनात करण्याचा आणि रात्री उंच ठिकाणी सराव करण्याचा दावा केला होता. यावर राहुल गांधी यांनी ट्वीट करून म्हटले होते, "सीमेवर आम्ही एका नवीन युद्धाच्या संकटाला सामोरे जात आहोत. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही."
राहुल गांधीकडून सातत्याने सीमा सुरक्षेसंबंधित मुद्दे
उल्लेखनीय म्हणजे राहुल गांधी सातत्याने सीमा सुरक्षेशी संबंधित मुद्दे मांडत आहेत. सोशल मीडिया, मीडिया किंवा सार्वजनिक सभा असो, त्यांनी अनेक प्रसंगी सीमा सुरक्षेशी संबंधित विषयांवर आपले अभिप्राय दिले आहेत. केंद्र सरकारवर त्यांचा निशाणा असतो.
गेल्या वर्षी चीन आणि भारतीय लष्करामध्ये चकमक झाली होती. नंतर, दोन्ही देशांमधून माघार घेण्याच्या प्रक्रियेबाबत चर्चा सुरू झाली. दोन्ही देशांच्या सैन्यानेही या दिशेने पावले उचलली. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही, चिनी बाजूने विलंब होत आहे.
या दरम्यान, असे अनेक प्रसंग होते जेव्हा राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताची जमीन चीनला दिल्याचा आरोप केला होता. चीनने भारताच्या भूमीवर कब्जा केला. मात्र, सरकारने हा आरोप फेटाळला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही याबाबत संसदेत निवेदन दिले आहे.