नवी दिल्ली : संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin gadkari) यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांच्या हस्ते चिंतामणराव देशमुख पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad pawar) नितीन गडकरी यांच्या कामाचे कौतुक करत, त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. तसेच, त्यांच्या कामाबद्दल नेहमीच इतर खासदार कौतुक करतात, चांगलं सांगतात असेही पवारांनी म्हटले. राजधानीत ज्यांनी कर्तुत्व गाजवलं त्यांच्यावर पुस्तक लिहिण्यात येत आहे, दुसऱ्या बाजूला सी.डी देशमुख यांच्या नावाने पुरस्कार दिला जात असून नितीन गडकरींना हा पुरस्कार आहे, याचा आनंद झाला, असे शरद पवारांनी म्हटले. गडकरींचे काम फक्त महाराष्ट्रापुरते आहे असं म्हणणं खरं नाही, गडकरींच्या उंचीची व्यक्ती आम्हाला दिसत नाही, अशा शब्दात शरद पवारांनी गडकरी यांच्याबद्दल प्रतिपादन व्यक्त केलं.
कोणत्याही खासदाराला प्रश्न विचारला तरी ते नितीन गडकरी यांच्याबद्दल चांगलंच बोलतात, त्यांच्या कामाचे कौतुक होते. गडकरींच्या कामाबद्दल 70 टक्के खासदार आम्हाला सांगतात, गडकरींच्या कामाबद्दल खासदारांना प्रचंड विश्वास आहे. त्यामुळेच, गडकरींच्या उंचीचा व्यक्ती आम्हाला दिसत नाही, असे म्हणत शरद पवारांनी नितीन गडकरींवर स्तुतीसुमने उधळली आहेत.
स्वातंत्र्यपूर्वी काळातील आठवणींना उजाळा
शरद पवारांनी पुढे बोलताना म्हटले की, स्वातंत्र्यांच्या पूर्वी मंत्रिमंडळात बाबासाहेब, सी.डी. देशमुख अशी मोठी माणसे होती, त्यांच्या नियोजनामुके अनेक दूरगामी परिणाम झाले आहेत. दक्षिणेतील अनेक राज्यांना आज वीज मिळते, करन्सी हा त्यांचा आवडीचा विषय होता. संयुक्त महाराष्ट्राच्यासाठी संघर्ष झाला, त्यात लोक हुतात्मा झाले. त्यावेळी, त्यांनी नेहरूना स्पष्ट सांगून राजीनामा दिला होता. स्वातंत्र्याच्या नंतर देशाच्या लोकसभेचे पहिले अध्यक्ष मावळणकर यांची निवड झाली होती. जेव्हा देशावर आक्रमण झालं तेव्हा यशवंतराव चव्हाण देशाचे संरक्षण मंत्री झाले. तर, काकासाहेब गाडगीळ यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत योगदान दिले आहे. सन 1967 मध्ये विधानसभेला मी उभा राहिलो, माझ्या लोकसभेचे उमेदवार खाडिलकर होते, त्यांनी मी एकत्र काम केलं. कोकण रेल्वेचा निर्णय मधू दंडवते यांनी घेतला, ती खाली केरळ पर्यंत जाते, अशा आठवणींना शरद पवारांनी या पुरस्कार सोहळ्यातून उजाळा दिला.
मराठीचा मला अभिमान
सी.डी. देशमुख यांच्या नावाचा पुरस्कार स्विकारण्याची माझी पात्रता आहे का माहिती नाही, असे म्हणत नितीन गडकरी यांनी पुरस्कार स्वीकारला. तसेच, काळाच्या ओघात आपण अनेक गोष्टी विसरतो, विस्मृती माणसाला मिळालेली देणगी आहे. मराठीचा आम्हाला अभिमान आहे, हिंदीचाही तितकाच अभिमान आहे, असे गडकरींनी भाषणावेळी म्हटले.