बीड : अभिनेते सयाजी शिंदे यांनी बीडमध्ये (Beed) उभारलेल्या देवराई प्रकल्प परिसरात मागील पंधरा दिवसात दोन वेळा आग लागण्याचा प्रकार समोर आला. याच संदर्भात सयाजी शिंदे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिलीय. बीडमध्ये आधीच झाडांची संख्या कमी आहे, त्यामुळेच सह्याद्री वनराईत मोठ्या संख्येनं झाडं लावण्यात आली असून ही झाडं जाळण्याचा जाणीवपूर्वक प्रकार होत आहे. त्यावरुन सयाजी शिंदे (Sayaji shinde) यांनी संताप व्यक्त केला असून झाडं (Tree) जाळणाऱ्या माणसाला पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो पळून गेला. 

Continues below advertisement

पहिल्यांदा आग लावली तेव्हा 100-150 झाडं जळाली होती, आता पुन्हा एकदा आग लावण्यात आली असून गेल्या 7 वर्षांपूर्वी लावलेली झाडं जाळण्यात आली आहेत. दिवसाढवळ्या सकाळी 11 वाजता तीन ठिकाणी आग लावण्यात आली आहे, असे सयाजी शिंदे यांनी म्हटले. तसेच, आमची माणसं आणि वन विभागाचे अधिकारीही तेथे काम करत आहेत. त्यामुळे, या घटनांना आळा बसला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. याबाबत आपण जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही सयाजी शिंदे यांनी म्हटले.दरम्यान, काल शुक्रवारी पुन्हा एकदा देवराई प्रकल्प परिसरात आग लागल्याची घटना घडल्यानंतर वनविभागासह सयाजी शिंदे यांच्या बीडमधील शिष्टमंडाने देवराई प्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन घडलेला संपूर्ण प्रकार त्यांना सांगण्यात आला. याच प्रकल्प परिसरात सीसीटीव्ही लावल्यासाठी या शिष्टमंडाने प्रशासनासोबत चर्चा देखील केली आहे. 

सयाजी शिंदे यांच्या पुढाकारातून आणि वनविभागाच्या सहकार्यातून बीडच्या पालवन शिवारातील सह्याद्री देवराई प्रकल्पात झाडं लावण्यात आली होती. या प्रकल्पाला बुधवारी सायंकाळी भीषण आग लागली. या आगीनं क्षणात रौद्ररूप धारण केलं. झाडं, औषधी वनस्पतींची नासधूस आणि पक्षांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. येथील ओसाड डोंगराला हिरवागार करण्यासाठी सयाजी शिंदे यांनी अथक परिश्रम घेतले होते. गेल्या, 7 वर्षांपासून तेथे त्यांच्या माध्यमातून वनराई फुलवण्यात आली आहे. मात्र, समाजकंटकांना हे बघवत नसून त्यांनी ही झाडं जाळून टाकल्याने वृक्षप्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर, डोळ्यादेखत झाडांची नासधूस झाल्यामुळे सयाजी शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना नाराजी व्यक्त केली. 'बीडमधील घडलेली घटना अत्यंत दुर्देवी आहे', असं  शिंदे म्हणाले.

Continues below advertisement

हेही वाचा

70 बिनविरोध निवडीवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल; चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार, सांगितलं राज'कारण'