पुणे: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने पुणे मतदारसंघातून रवींद्र धंगेकर यांच्यासारखा तगडा उमेदवार मैदानात उतरवला आहे. यापूर्वीच्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसने पुणे लोकसभेच्या मैदानात एकतर लोकांना फारसे परिचित नसणारे किंवा लोकांशी बिलकून कनेक्ट नसणाऱ्या नेत्यांना उमेदवारी दिली होती. परंतु, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ही चूक सुधारली असून भाजपचा कसब्याचा बालेकिल्ला सर करणाऱ्या रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना पुण्यातून रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे पुण्यात काँग्रेस पक्ष (Congress) निवडणूक जिंकू शकेल, अशी शक्यता दृष्टीपक्षात आली आहे. परंतु, जरा काही चांगले घडू लागले की काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी उफाळून येते आणि सगळे काही विस्कटून टाकते, हा नेहमीचा अनुभव आहे. काँग्रेसच्या याच जुन्या सवयीमुळे पुणे लोकसभा मतदारसंघात (Pune Loksabha constituency) रवींद्र धंगेकर यांचा घात तर होणार नाही ना? अशी कुजबूज राजकीय वर्तुळात रंगली आहे.


या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी डॅमेज कंट्रोलसाठी पुण्यात धाव घेतली आहे. बाळासाहेब थोरात सोमवारी संध्याकाळी पुण्यातील काँग्रेस भवनात पोहोचले. याठिकाणी पुण्यातील काँग्रेसचे नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. रवींद्र धंगेकर यांना पुणे लोकसभेची उमेदवारी दिल्याने काँग्रेसच्या गोटात नाराजी असल्याची चर्चा आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी बाळासाहेब थोरात यांनी ही बैठक बोलावल्याचे सांगितले जाते. बाळासाहेब थोरात यांच्याकडून पुण्यातील काँग्रेसच्या नेत्यांच्या नाराजीचे नेमके कारण शोधले जाईल, तसेच त्यावर चर्चाही केली जाईल. मात्र, या बैठकीला काँग्रेसचे माजी नगरसेवक आबा बागुल उपस्थित राहिलेली नाहीत. रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसने पुणे लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर आबा बागुल नाराज झाले होते. त्यांनी पुण्यातील काँग्रेस भवनासमोर धंगेकरांच्या उमेदवारीच्या निषेधार्थ आपल्या समर्थकांसह मूक आंदोलन केले होते. आतादेखील ते थोरातांनी बोलविलेल्या बैठकीला उपस्थित राहिलेले नाहीत. त्यामुळे आता बाळासाहेब थोरात पुण्यातील काँग्रेस नेत्यांची नाराजी कशाप्रकारे दूर करणार, हे पाहावे लागेल.


पुण्यात धंगेकरांसमोर मुरलीधर मोहोळांचं कडवं आव्हान


रवींद्र धंगेकर यांनी कसबा विधानसभेची पोटनिवडणूक जिंकून राजकीय इतिहास घडवला होता. त्याकाळात पुण्यात रवींद्र धंगेकर यांची जोरदार हवा होती. यानंतरच्या काळातही रवींद्र धंगेकर हे सातत्याने चर्चेत राहिले आहेत.  मात्र, पुणे लोकसभेची निवडणूक रवींद्र धंगेकर यांच्यासाठी तितकीशी सोपी नाही. धंगेकर यांच्यासमोर भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याचे आव्हान आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या पाठिशी भाजपची अजस्त्र यंत्रणा आहे. त्यासोबतच मुरलीधर मोहोळ यांनाही पुण्यातील राजकारणाची नस माहिती आहे. कसबा पोटनिवडणुकीत ब्राह्णण मतदारांची नाराजी भाजपला महागात पडली होती. परंतु, भाजपने मेधा कुलकर्णी यांचे राज्यसभेत पुनर्वसन करुन ही नाराजी दूर केली आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीत कसबा मतदारसंघातून रवींद्र धंगेकर यांना गेल्यावेळप्रमाणे लीड मिळेल का, याबाबत शंका आहे. याशिवाय, कोथरुडच्या बालेकिल्यातून भाजपला मिळणारी लीड मोडून काढणे, हे रवींद्र धंगेकर यांच्यासाठी अशक्यप्राय आव्हान असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पुणे लोकसभेची लढाई ही रवींद्र धंगेकर यांच्यासाठी अवघड आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी उफाळून आल्यास पुणे लोकसभा निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांचा पराभव होऊ शकतो.


आणखी वाचा


28 वर्षांनी इतिहास रचला, कसब्यात भाजपच्या गडाला खिंडार; कोण आहेत रवींद्र धंगेकर?