Shirdi Lok Sabha Constituency : 2014 साली भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure) यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसची वाट धरली आणि त्यावेळी सदाशिव लोखंडेंनी (Sadashiv Lokhande) भाऊसाहेब वाकचौरे यांचा पराभव करत अवघ्या 17 दिवसात खासदारकी मिळवली होती. मात्र आता भाऊसाहेब वाकचौरे हे शिवसेना उद्धव ठाकरे गटात गेले असून शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडे यांना कामाला लागण्याचे आदेश दिले असल्याची माहिती विद्यमान खासदार लोखंडे यांनी दिली आहे. आज शिर्डीतील महायुतीच्या मेळाव्यात खासदार लोखंडे यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. 


अनुसूचित जातींसाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघ (Shirdi Lok Sabha Constituency) राखीव आहे.  2009 साली हा मतदारसंघ राखीव झाला होता. त्यापूर्वी काँग्रेसचे वर्चस्व या मतदारसंघावर होतं. मात्र 2009 नंतर सातत्याने शिवसेनेच्या उमेदवाराने या ठिकाणी विजय मिळवला आहे. गेल्या काही वर्षात झालेल्या राजकीय घडामोडीनंतर पुन्हा एकदा 2024 मध्ये भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध सदाशिव लोखंडे अशी लढत होण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. 


मला कामाला लागण्याचे आदेश - सदाशिव लोखंडे 


खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले की, आमच्या नेत्यांनी मला कामाला लागण्याचे आजच आदेश दिले आहेत. पक्षाचे नेते अधिकृत घोषणा करतीलच. मात्र त्यांनीच आम्हाला आदेश दिलेत. सगळ्या पक्षांना जागेवर दावा करण्याचा अधिकार आहे. ज्यांना तूप चोर व गद्दार बोलले त्यांनाच आज उध्दव ठाकरे उमेदवारी देताय. 


सदाशिव लोखंडेंचे भाऊसाहेब वाकचौरेंना आव्हान


मोदींच्या नावानेच ठाकरेंनी मते घेतली. मात्र आम्ही कुठ गेलो नाही तेच गेले. सभामंडप मांडण्याशिवाय काय केलं हे वाकचौरे यांनी सांगावं, अशी टीका त्यांनी यावेळी भाऊसाहेब वाकचौरेंवर (Bhausaheb Wakchaure) केली आहे.  त्यांचा अखर्चित निधी मला मिळाला. खासदार निधी वगळता काय केले हे दाखवाव, असे आव्हान देखील भाऊसाहेब वाकचौरे यांना सदाशिव लोखंडे यांनी दिले असून शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो मला मान्य, असेही त्यांनी म्हटले आहे. 


शिर्डीत लोखंडे वाकचौरे लढत? 


दरम्यान, 2014 साली झालेल्या लोखंडे विरुद्ध वाकचौरे निवडणुकीत लोखंडे यांनी विजय मिळवला होता. शिवसेना ठाकरे गटाकडून शिर्डीच्या जागेवर भाऊसाहेब वाकचौरे यांचे नाव आघाडीवर आहे. तर शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडेंनाच पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या दोघांनाही उमेदवारी मिळाल्यास पुन्हा एकदा लोखंडे विरुद्ध वाकचौरे ही लढत पाहायला मिळणार आहे. मात्र मतदार कोणाला कौल देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


आणखी वाचा 


नाशिकवरून महायुतीत धुसफूस वाढली! गोडसेंच्या शक्तिप्रदर्शनानंतर नाशिक भाजपचा मोठा निर्णय!


धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे शांतीगिरी महाराजांच्या भेटीला, नाशिक लोकसभेबाबत मोठ्या निर्णयाची शक्यता