बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण आता राज्यातील हिवाळी अधिवेशनासह संसदेत देखील चर्चेत आले आहे. बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांच्यासह महाविकास आघाडीच्या खासदारांनी बीड जिल्ह्यातील सरपंच हत्येप्रकरणी संसदेच्या मकरद्वारावर आंदोलन केलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना बजरंग सोनावणे म्हणाले, बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आम्ही आंदोलन केलं. या घटनेमागचा मास्टरमाईंड शोधून त्याला शिक्षा व्हावी, खुनाचा कट कोणी रचला याची माहिती पोलिसांनी दिली पाहिजे. पीएसआयला निलंबित केलं. त्याला सहआरोपी केलं पाहिजे ही माझी मागणी आहे. कारण तो पीएसआय आरोपी सोबत चहापान करत होता, असंही यावेळी त्यांनी म्हटलं आहे.
या आरोपींचे सीडीआर तपासावे, म्हणजे लक्षात येईल की यांना कोणाचे फोन आले होते. त्या फोनचे कनेक्शन कुठे जातात हे समजलं पाहिजे. जे आरोपी आहेत त्यांना हे कोणी करायला लावलं हे जनतेला समजायला हवं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मला चौकशीच आश्वासन दिलं आहे. काल मुख्यमंत्री यांनी सांगितलं की एसआयटी स्थापन करू. पंकज देशमुख, हर्षद पोटादर अशा चांगल्या अधिकाऱ्यांच्या मार्फत एसआयटी स्थापन करावी, असंही खासदार बजरंग सोनावणे यांनी म्हटलं आहे.
संदीप क्षीरसागर यांनी कराड यांचं नाव घेतलं आहे. मारेकऱ्यावर कारवाई करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी ही आमची भूमिका आहे.
दोन मंत्रिपद मिळून देखील ते यावर बोलत नाही हे जिल्ह्याचं दुर्दैव आहे. त्यांना मंत्रिपदातून वेळ नसेल म्हणून ते या घटनेवर बोलले नसतील. पीएसआय बदलण्याची मी मागणी केली होती, ती कायम आहे. बीडचे एसपी यांची बदली झाली, तरच न्याय मिळेल अन्यथा न्याय मिळणार नाही. आम्ही महाविकास आघाडी, इंडिया आघाडीचे लोक मिळून आंदोलन करत होतो, असंही त्यांनी म्हटलं आहे.
यावेळी प्रियंका गांधी, काँग्रेसचे खासदार देखील उपस्थित होते. या आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी सगळे उपस्थित होते. राज्य सरकार तपास करायला कार्यक्षम नाही. राज्यातील लोकांचे काही हितसंबंध जोडले आहेत. म्हणूनच हा तापस केंद्रीय गुप्तचर यंत्रणा कडे द्यावा ही मागणी आहे. तशीच मागणी मी अमित शाह यांच्याकडे केली आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.
माझ्या जीवाची भीती मला कधीच वाटत नाही
माझ्या जीवाची भीती मला कधीच वाटत नाही. मला संरक्षणाची गरज आहे, हे मला माहीत आहे. पण त्या संरक्षणाची गरज बीडच्या एसपी, पोलिस यांना वाटत नाही. शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी देखील तशी मागणी केली आहे. मात्र, त्यांना गरज वाटतं नसेल म्हणून ते मला संरक्षण देत नसतील, असंही सोनावणेंनी म्हटलं आहे.