तब्बल आठ तासाच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची आज ईडीकडून चौकशी सुरू झाली. ईडीने ही सकाळीच नवाब मलिक यांच्या घरी धडक दिली होती. ही बातमी बाहेर येताच सकाळीच राज्यात खळबळ उडाली. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.


कायदा हातात घेण्याचा अधिकार आपल्याला नाही
या देशात कायदा सर्वश्रेष्ठी आहे. कायद्यासमोर आमदार, खासदार कोणीही मोठा नाही. हे या ठिकाणी पुन्हा एकदा कायद्याने दाखवून दिलं आहे, कायदा हातात घेण्याचा अधिकार आपल्याला नाही. आणि सत्ताधारी पक्षाला तर नाहीच नाही. जर नवाब मलिक यांचा संदर्भ ईडीच्या कुठल्या विषयात असेल तर त्याठिकाणी चौकशी करून तपासणे हा त्यांचा कामाचा भाग आहे, आणि ईडी विनाकारण अटक करत नाही. अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.  राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून हे बेकायदेशीर आहे असं सांगत विरोध करण्यात आला. त्यावर उत्तर देताना, हे बेकायदेशाीर नसून न्याययंत्रणा आहे,. कोर्टामध्ये बेकायदेशीर असल्यास त्यांनी कोर्टात सांगावं. सर्व गोष्टी न्याययंत्रणेच्या माध्यमातूनच होतील असे दरेकर यावेळी म्हणाले.


राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ


नवाब मलिक हे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसह दाखल झाले होते. नवाब मलिक यांच्या अटकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अनिल देशमुख यांच्यानंतर मंत्रीपदावर असताना अटक झालेले मलिक हे दुसरे मंत्री आहेत. नवाब मलिक यांना वैद्यकीय तपासणीसाठी जे.जे. रुग्णालयात नेण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना कोर्टात नेण्यात येण्याची शक्यता आहे. दाऊद इब्राहिमच्या मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात नवाब मलिक यांचाही सहभाग असल्याचा पुरावे सापडले असल्याचे सूत्रांनी सांगितले. 


मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती.


दाऊदचा भाऊ इब्राहिम कासकरला ईडी कोठडी


अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला शुक्रवारी सात दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या जवळील लोकांविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास सुरु आहे. याप्रकरणी ईडीने इक्बाल कासकरला अटक केली होती. शुक्रवारी इक्बाल कासकरला विशेष मुंबईतील विशेष पीएमएलए  कोर्टात हजर केलं होतं. यावेळी कोर्टाने इक्बाल कासकरला सात दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.