Prashant Kishor On Bharat Jodo Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो यात्रेचा आज 13 दिवस आहे. केरळमधून सुरु झालेली ही यात्रा 29 सप्टेंबरला कर्नाटकात दाखल होणार आहे. या यात्रेद्वारे तळागाळातील जनतेशी संवाद साधण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. तसेच या यात्रेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन ऊर्जा देखील संचारेल, असं बोललं जात आहे. याच दरम्यान, माजी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी या यात्रेवर आपली प्रतिक्रिया आणि सल्लाही दिला आहे. 


काय म्हणाले प्रशांत किशोर? 


प्रशांत किशोर यांनी मंगळवारी म्हणाले की, काँग्रेसची भारत जोडो यात्रा गुजरात किंवा भाजपशासित इतर कोणत्याही राज्यातून सुरू व्हायला हवी होती. ते म्हणाले, "काँग्रेसने आपली भारत जोडो यात्रा गुजरातमधून सुरू करायला हवी होती. कारण येथे या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत, किंवा उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सारख्या भाजपशासित राज्यांमधून ही यात्रा सुरु करायला हवी होती.'' राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा कन्याकुमारीपासून सुरू झाली.


या वर्षाच्या सुरुवातीला प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याची चर्चा होती. मात्र नंतर त्यांनी सांगितले की, त्यांनी निवडणूक रणनीतिकार म्हणून नेतृत्व करण्याची ऑफर नाकारली होती. विदर्भात समर्थकांशी संवाद साधताना ते असं म्हणाले होते. ते म्हणाले होते की, मी राजकीय रणनीतीकार म्हणून काम करणे सोडून दिले असून आता कोणत्याही पक्षासाठी नव्हे तर जनतेसाठी काम करायचे आहे. 


दरम्यान, पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये हालचालींना गती आली आहे. खासदार राहुल गांधी हे पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचे जवळजवळ स्पष्ट झालं आहे. यातच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि खासदार शशी थरूर हे या निवडणुकीत आपला अर्ज दाखल करू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी थरूर यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यावेळी थरूर यांनी सोनिया गांधी यांना आपण काँग्रेस पक्षाध्यक्षपदाच्या निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं होत. यावर सोनिया गांधी यांनी त्यांना परवानगी देत कोणीही काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढू शकतो, असं म्हटलं होत. यातच आज अशी बातमी समोर आली की, अशोक गेहलोत या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करू शकतात. यासाठीच त्यांनी आज राजस्थानमधील काँग्रेस आमदारांची बैठक बोलावली असल्याचं बोललं जात आहे. ही बैठक आज रात्री 10 वाजता होईल. या बैठकीनंतर काही महत्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात.