Prakash Mahajan Resignation: मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. प्रकाश महाजन हे मनसेचे प्रवक्ते होते. अनेक वर्षा त्यांनी मनसे पक्षात काम केले होते. त्यांच्या राजीनाम्यामुळे (Resignation) छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) राज ठाकरेंना (Raj Thackeray) मोठा धक्का बसल्याचे दिसून येत आहे. आता प्रकाश महाजन यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे. 

Continues below advertisement

प्रकाश महाजन एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, माझा थोडं वय वाढलं आहे आणि काही गोष्टी मनाविरुद्ध घडतात. त्यामुळे मी थांबायचे ठरवले आहे. माझा बाकी कोणावर राग नाही असे त्यांनी म्हटले. नारायण राणेंना आव्हान देणे तुम्हाला भावलं का? असे विचारले असता प्रकाश महाजन म्हणाले की, नाही तसे काहीही नाही. कुठेतरी थांबले पाहिजे. त्यामुळे मी थांबलेलो आहे. बाकी काहीही नाही, असे देखील त्यांनी सांगितले. 

या वयात मनस्थिती चांगली राहिली पाहिजे

तुमचा कुठल्या गोष्टीवर आक्षेप आहे? याबाबत विचारले असता मी अत्यंत लहान प्रवक्ता आहे. माझा काय आक्षेप असणार? मी कुठल्याही मोठ्या पदावर नव्हतो. माझ्यासारखा छोटासा प्रवक्ता राहिला काय आणि गेला काय? फार मोठा परिणाम होणार नाही. पण या वयात आपली मनस्थिती चांगली राहिली पाहिजे म्हणून मी ठरवले की, आता या सर्व गोष्टींपासून आपण दूर जावे, असे प्रकाश महाजन म्हणाले.  

Continues below advertisement

आपणच बाहेर पडलेले काय वाईट

तुमच्या मनाविरुद्ध नेमकं काय घडलं? याबाबत विचारले असता प्रकाश महाजन म्हणाले की, काही गोष्टी आहेत. कोणीतरी आपल्याला जा म्हणण्यापेक्षा आपणच बाहेर पडलेले काय वाईट आहे. बाकी कुणावर राग असण्याचे कारण नाही. वाईट या गोष्टीचे वाटते की, मी अमित ठाकरे यांना दिलेला शब्द पाळू शकलेलो नाही, असे त्यांनी म्हटले. 

दोन भाऊ आम्हालाच विसरून गेले

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले नाहीत तर नियती त्यांना माफ करणार नाही, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी प्रकाश महाजन यांनी केले होते. हे वक्तव्यच तुमच्यासाठी राजीनाम्याचे कारण ठरले का? असे विचारले असता प्रकाश महाजन म्हणाले की, मी असलो काय आणि नसलो काय? माझी प्रामाणिक भूमिका होती की, दोन्ही भावांनी एकत्र यावं. माझ्या वक्तव्याविषयी तेव्हा मला खूप ऐकावे लागले. पण, शेवटी दोन भाऊ एकत्र आलेच ना. त्यावेळेस माझी कुणाला आठवण झाली नाही की, मी अशी भूमिका घेतली होती. मी जोपर्यंत तिथे होतो मी प्रामाणिकपणे काम केले. मी दोन महिन्यांपूर्वी बोललो होतो आणि आज दोन भाऊ एकत्र आले ही चांगलीच गोष्ट आहे. नाशिकमध्ये इतका मोठा मोर्चा निघाला. आता दोन भाऊ आम्हालाच विसरून गेले, त्याला आम्ही काय करू शकतो? असे त्यांनी म्हटले.

आणखी वाचा 

Vijay Wadettiwar on Manoj Jarange Patil : कोणाला नेपाळला सोडायचं अन् कोणाला नाही हे जरांगे ठरवणार का? भुजबळांवर हल्लाबोल होताच विजय वडेट्टीवार मैदानात; म्हणाले...