Vijay Wadettiwar on Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यात जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी भुजबळांवर जोरदार हल्लाबोल केला. तुझ्या आरक्षणावर कुणी अतिक्रमण केलंय, याच्या ध्यानातच काही राहिना झालंय, आता हा विसरभोळा मंत्री झाला आहे. तो आता अंधश्रद्धा बाळगत आहे. याला तिकडं नेपाळ, नागालँडमध्ये सोडायला हवं, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. आता मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी पलटवार केलाय.
नेमकं काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
विजय वडेट्टीवार म्हणाले की, कोणाला नेपाळला सोडायचे आणि कोणाला नाही हे जरांगे कसं ठरवणार? त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य करणे मनोज जरांगे यांनी टाळायला पाहिजे. जे चळवळीमध्ये काम करत असतील त्यांना परदेशात पाठवायचं असेल तर एकट्या मनोज जरांगेंनीच महाराष्ट्रात राहायचं आहे का? आमच्या समाज बांधवांच्या सामाजिक आणि न्यायक अधिकार टिकवणे आणि लढणे, याबाबत कोणी वैयक्तिक टीका करणे हे भुजबळ साहेबांनी आणि मनोज जरांगे यांनी सुद्धा टाळलं पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
भरत कराडच्या मृत्यूला सरकार जबाबदार : विजय वडेट्टीवार
लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावातील 35 वर्षीय तरुण भरत महादेव कराड याने ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधार्थ मांजरा नदीच्या पात्रात उडी मारून आत्महत्या केली आहे. याबाबत विजय वडेट्टीवार यांना विचारले असता ते म्हणाले की, लातूरचा तरुण सातत्याने ओबीसी चळवळीत काम करणारा कार्यकर्ता होता. प्रत्येक ओबीसी बैठकीला, मेळाव्याला तो जात होता. ओबीसीच्या आरक्षणासाठी तो लढत होता. त्यामुळे हा जो काही सरकारने निर्णय घेतला आणि त्याने आपली जीवन यात्रा संपवली. मी पण येत्या दोन दिवसात त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाणार आहे. त्या कुटुंबाला सरकारने आधार देण्याची आणि जबाबदारी घेण्याची गरज आहे. सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा हा बळी आहे. यासाठी सरकार जबाबदार आहे. त्यामुळे कुटुंबीयांना भरपूर मदत केली पाहिजे. सरकारने त्या जीआरचा पुनर्विचार केला पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा