अहमदनगर : महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यासाठी महाविकास आघाडीचे दिग्गज नेते कामाला लागले आहेत. स्वत: शरद पवार यांनी लंकेंसाठी सभा घेत एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराला निवडून देण्याचे आवाहन केले. तर, महायुतीचे उमेदवार सुजय विखेंना (Sujay Vikhe) निलेश लंकेंचं तगडं आव्हान मिळाल्याने येथील निवडणूक चांगलीच चर्चेत आहे. त्यातच, आता पंतप्रधान नरेंद्र मोदीही विखे पाटील यांच्यासाठी प्रचारसभा घेणार आहे. त्यामुळे, लंकेंच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी महायुतीही जोमाने काम करत आहे. त्यातच, लंके यांनी पोलिसांना उद्देशून केलेल्या विधानामुळे आता ते अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, निलेश लंके यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.


अहमदनगर दक्षिण लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेकडून करण्यात आली आहे. संघटनेने निवडणूक आयोग आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे. निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर एका भाषणात बोलताना निलेश लंके यांनी पोलिसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. कार्यकर्त्यांवरती कारवाई झाल्यानंतर निलेश लंके यांनी भाषणादरम्यान "इथे पोलीस विभागातील कोणी असेल तर संबंधित पीआयला सांगा तुमचा बाप दहा मिनिटात तिथे येतोय" असं विधान केलं होतं. निलेश लंकेंच्या या विधानावरुन आता महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना आक्रमक झाली असून पोलिसांचा बाप काढणाऱ्या निलेश लंके यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच, निलेश लंके यांच्या वक्तव्याचा पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे.


खरा चेहरा समोर आला - विखे पाटील


दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी आपल्या भाषणादरम्यान पोलीस प्रशासनाला धमकी दिली होती, यावर बोलताना भाजप उमेदवार सुजय विखे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मी पांडुरंगाचे आभार मानेल की समोरच्या उमेदवाराचा खरा चेहरा भाषणाच्या माध्यमातून समोर आला आहे. ही गोष्ट एकदा घडली नसून दोनदा घडली आहे, शेवगाव येथे देखील सभेदरम्यान शरद पवारांसमोर उमेदवार पोलिसांबद्दल बोलले होते. त्यामुळे, अशा प्रकारची प्रवृत्ती अहिल्यानगरची जनता कदापिही स्विकारणार नाही. हा खरा चेहरा जनतेपुढे आला याचा मला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया सुजय विखे यांनी दिली होती.


हेही वाचा


अहमदनगरमध्ये मोठा ट्विस्ट, सेनापती विखेंकडे पण सैन्य लंकेच्या पाठीशी; ठाकरेंचा दबदबा कायम