मुंबई : कल्याण, भिवंडी, ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Pm Modi Sabha)  सभा होणार आहे. मोदींची सभेपूर्वी कल्याणमध्ये जिल्हा पदाधिकाऱ्यांचे  मानापमान नाट्य रंगले. जिल्हाप्रमुखांना व्यासपीठावर जागा न देता आमदा, शहरप्रमुखांना तसेच इतर पदाधिकाऱ्यांना व्यासपीठावर स्थान दिल्याने कल्याण मुरबाड जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी नाराजी व्यक्त करत थेट राजीनामा दिला आहे. वर्षभरपूर्वी  अरविंद मोरे (Arvind More) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला रामराम करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.  


एकनाथ शिंदे यांनी कल्याण आणि मुरबाड जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी अरविंद मोरे यांच्याकडे दिली होती. सध्या अरविंद मोरे कल्याणचे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदेंचा प्रचार करत होते. मोदींच्या सभेत व्यासपीठावर जागा न दिल्याने अरविंद मोरे नाराज होते. अरविंद मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित नाराजी व्यक्त केली आणि राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यासपीठावर निमंत्रण नसल्याने शहरप्रमुख पदाचा राजीनामा स्वीकारण्याची मुख्यमंत्र्यांना केली पत्राद्वारे विनंती केली.  


कल्याणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा


 कल्याणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे.  या सभेसाठी व्यासपीठांवर निमंत्रीत पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हाप्रमुखांना निमंत्रण नाही. आमदार, शहरप्रमुख, आमदार हे व्यासपीठावर निमंत्रीत असताना शिवसेना पदाच्या प्रोटोकॉलप्रमाणे यजमान जिल्हा प्रमुखाला व्यासपीठावर उपस्थित राहण्याचा मान मिळायला हवा होता. पण जाणीवपूर्वक माझे नाव डावलले असल्याने मी माझ्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे. असे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे


जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांचे पत्र जसेच्या तसे,


महोदय, 


मी अरविंद बाळकृष्ण मोरे, जिल्हाप्रमुख कल्याण मुरबाड विधानसभा क्षेत्र आपल्या पदाचा राजीनामा देत आहे. ज्या जिल्हाप्रमुख पदाला धर्मविर आंनद दिघे साहेब यांनी सन्मान प्राप्त करून दिला आपण स्वतः अनेक वर्षे जिल्हाप्रमुख म्हणून काम करत असतानाच अनेक मोठे पद आपल्याकडे आपल्या उत्कृष्ट कामगिरीने चालत आली. पण आज कल्याण (प) मध्ये भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी साहेब यांची जाहीर सभा असतांना स्टेजवरील निमंत्रीत पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हाप्रमुख म्हणून माझे नाव नाही आहे. 


आमदार, शहरप्रमुख, आमदार हे स्टेजवर निमंत्रीत असतांना शिवसेना पदाचा प्रोटोकॉल प्रमाणे यजमान जिल्हा प्रमुखाला स्टेजवर उपस्थित राहण्याचा मान मिळायला हवा होता. पण जाणीवपुर्वक माझे नाव डावलले असल्याने मी माझ्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे.


जय महाराष्ट्र


आपला नम्र, 


अरविंद मोरे


हे ही वाचा:


Eknath Shinde: मोदीजी म्हणाले, तुमचा आवाज बसणार, गुळण्या करा; पंतप्रधानांच्या आपुलकीने मुख्यमंत्री शिंदे भारावले