मुक्ताईनगर:- सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निकालावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी प्रतिक्रिया दिली होती. या प्रतिक्रियेवर भाजपचे आमदार घोरपडे यांनी उत्तर दिले. मात्र या उत्तरावरून आता पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे. कराड उत्तरचे भाजपचे आमदार रोहिणी खडसेंनी दिलेल्या प्रतिक्रियेवर बोलताना ‘रोहिणीताईंना सहकार मधले काही कळत नाही’ असं म्हणाले होते, त्यावरती रोहिणी खडसे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
रोहिणी खडसे म्हणाल्या की, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या ‘सह्याद्री’ विजयानंतर मी लोकांच्या मनात असलेला प्रश्न पुढे आणला त्यावरून ‘रोहिणीताईंना सहकार मधले काही कळत नाही’ असे भाजपचे आमदार मनोज घोरपडे म्हणाले. छान! काय आहे ना, आपली संख्या जास्त असली, आपले बहुमत जास्त असले तर लोकांना आपणच श्रेष्ठ आहोत असे वाटतं, त्यांच्या व्यतिरिक्त इतरांना काही कळतच नाही असा त्यांचा भ्रम असतो. 100 वर्षांपूर्वी काही लोकांना असंच वाटायचं पण महात्मा ज्योतिबा फुले यांनी असा काही आसूड ओढला की सर्व भ्रम मोडीत काढले असा टोला त्यांनी लगावला आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, राहिला प्रश्न आमदार घोरपडे यांच्या वक्तव्याचा तर त्यांच्या वक्तव्यातून त्यांची पुरुषी मानसिकता दिसते. याच मानसिकते विरोधात महात्मा फुले आणि सावित्रीमाई लढल्या आणि आम्हा स्त्रियांना ‘गुलामगिरी’तून मुक्त केले होते. ज्योतिबा फुले आज विचाररुपी आमच्यात जिवंत आहेत हे घोरपडे सारख्या लोकांनी विसरू नये असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला आहे.
रोहिणी खडसेंनी याबाबत सोशल मिडियावरती पोस्ट लिहली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या ‘सह्याद्री’ विजयानंतर मी लोकांच्या मनात असलेला प्रश्न पुढे आणला त्यावरून ‘रोहिणीताईंना सहकार मधले काही कळत नाही’ असे भाजपचे आमदार घोरपडे म्हणाले. छान ! काय आहे ना, आपली संख्या जास्त असली, आपले बहुमत जास्त असले तर लोकांना आपणच श्रेष्ठ आहोत असे वाटतं, त्यांच्या व्यतिरिक्त इतरांना काही कळतच नाही असा त्यांचा भ्रम असतो. १०० वर्षांपूर्वी काही लोकांना असंच वाटायचं पण महात्मा ज्योतिबा फुले यांनी असा काही "आसूड" ओढला की सर्व भ्रम मोडीत काढले. राहिला प्रश्न आ. घोरपडे यांच्या वक्तव्याचा तर त्यांच्या वक्तव्यातून त्यांची पुरुषी मानसिकता दिसते. याच मानसिकतेविरोधात महात्मा फुले आणि सावित्रीमाई लढल्या आणि आम्हा स्त्रियांना ‘गुलामगिरी’तून मुक्त केले होते. ज्योतिबा फुले आज विचाररुपी आमच्यात जिवंत आहेत हे घोरपडे सारख्या लोकांनी विसरू नये'.
नेमकं काय प्रकरण?
सह्याद्री साखर कारखान्यातील निवडणुकीत भाजप नेत्यांच्या पॅनलचा धुव्वा उडाल्यानंतर रोहिणी खडसे यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यांनी एक ट्विट केले. यामध्ये त्यांनी म्हटले की, 4 महिन्यांपूर्वी 50 हजार मताधिक्याने जिंकलेला भाजप पार्टीचा एक आमदार, बॅलेट पेपर वर घेतलेल्या 'सहयाद्री कारखाना' निवडणूकीमध्ये विजयी उमेदवाराच्या अर्धी मते पण घेऊ शकला नाही. पैशाचा वारेमाप वाटप करुन देखील.....,असे रोहिणी खडसे यांनी म्हटले. यावर आता भाजपच्या नेत्यांकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहावे लागेल. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र सातारा जिल्ह्यातील कराड, कोरेगाव, सातारा, खटाव आणि सांगली जिल्ह्यातील कडेगाव अशा पाच तालुक्यात आहे. कारखान्याच्या एकूण 32 हजार 205 सभासदांपैकी 26,081 सभासदांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये सत्ताधारी पी डी पाटील पॅनलला तब्बल 15 हजाराहून अधिक मते मिळाली. तर भाजप आमदार मनोज घोरपडे आणि काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अँड. उदयसिंह पाटील यांच्या पॅनेलला 7000 ते 8000 दरम्यान मते मिळाली. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ आणि काँग्रेसचे निवास थोरात यांच्या तिसऱ्या पॅनेलला 2200 ते 2300 मते मिळाली.कराड उत्तरचे भाजपचे आमदार रोहिणी खडसेंनी दिलेल्या प्रतिक्रियेवर बोलताना ‘रोहिणीताईंना सहकार मधले काही कळत नाही’ असं म्हणाले होते, त्यावरती रोहिणी खडसे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.