Supriya Sule On Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस आणि भाजप सत्तेत आले नाही तर आपली डाळ शिजणार नाही. आपला जातीयवाद चालणार नाही. तसेच ही निवडणूक शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शेवटची ठरेल, असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं. यावर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.


पवार आणि ठाकरेंची ही शेवटची निवडणूक हे भाजप बोलतायत, याचा अर्थ त्यांना परत निवडणूका घ्यायच्या नाहीय का?, भाजपला संविधान बदलायचे आहे हे स्पष्ट होते. भाजपच्या मनात संविधान बदलण्याचं पाप दिसून येतंय. भाजपचं हे विधान संविधानाच्या विरोधात आहे, अशी टीका सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) केली.  आमचे सरकार ईडीच्या भितीने पाडले. राजकीय पोळ्या भाजण्यासाठी ही योजना काढली आहे. खरंच योजना असती तर श्रेय वाद नसता. ⁠कोणाचे सरकार येईल ते जनता ठरवेल, असं सुप्रिया सुळेंनी सांगितले. 


'शिंदेंसे बैर नही, देवेंद्र तेरी खैर नही', अशी टॅगलाईन देत सुप्रिया सुळेंनी पक्षाच्या प्रवक्त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक होण्याची आदेश दिले आहेत, अशा बातम्या समोर आल्या होत्या. या वृत्तांवर देखील सुप्रिया सुळेंनी भाष्य केलं आहे.  केवळ फडणवीसांना टार्गेट करा, असं मी कुठे म्हणाले?, मी कुठे बोलले याचं तुमच्याकडे पुरावा आहे का...तुमच्याकडे व्हिडीओ आहे का, मला तो दाखवा, असं प्रत्युत्तर सुप्रिया सुळेंनी दिलं. 


...म्हणून लाडकी बहीण आठवली- सुप्रिया सुळे


वृत्तवाहिनीवर पाहिले की, देवेंद्र फडणवीस एसओपी (SOP) करणार आहेत. जाहीरात कशी करायची कोणी करायची ही एसओपी तयार करणार आहेत.  एसओपी करावी लागते ही दुर्दैवी बाब आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही महिलांना सबलीकरण करण्यासाठी नाही तर स्वतःचा स्वार्थ साधण्याकरता आहे. हे स्वार्थी सरकार आहे, ⁠लोकसभेला अपयश आल्यावर लाडकी बहिण आठवली. भाऊ-बहींण्याच्या नात्यांचा हा अपमान आहे, असा निशाणा सुप्रिया सुळेंनी साधला. 


...तर कदाचित महायुतीची सत्ता जाणे अटळ


काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी देश आणि राज्य पातळीवर भाजपला चांगलाच धक्का दिला आहे. केंद्रात आणि राज्यात भाजप प्रणित (BJP) आघाड्यांची मोठी पिछेहाट झाल्याचे चित्र आहे. राज्यातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी भाजपप्रणित महायुतीला अवघ्या 17 जागांवर विजय मिळाला आहे. तर महाविकास आघाडीची 30 जागांवर सरशी झाली आहे. या निकालांनी महायुती आणि भाजपचे नेते प्रचंड अस्वस्थ झाले असल्याचेही बघायला मिळाले आहे. कारण लोकसभेचा हाच ट्रेंड आगामी विधानसभा निवडणुकीत कायम राहिला तर कदाचित महायुतीची सत्ता जाणे अटळ असल्याची शक्यता आहे.


संबंधित बातमी:


विनोद घोसाळकर दहिसर, किशोरी पेडणेकर भायखळा, वांद्रे पूर्व वरूण सरदेसाई, ठाकरेंचे संभाव्य 22 उमेदवार, यादी 'माझा'च्या हाती!