नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला (Mahayuti) मोठा पराभवाचा सामना करावा लागला. देशात अब की बार 400 पार आणि महाराष्ट्रात 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त करणाऱ्या भाजपने दोन्ही विजयाचे स्वप्न भंगले. मात्र, एनडीएला (NDA) स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे देशाच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी शपथ घेतली. पण, भाजपला (BJP) अपेक्षित असलेल्या उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातून सर्वात कमी जागा मिळाल्याने दिल्लीकरांनीही या पराभवाची कारणमिमांसा सुरू केली आहे. त्यातच, देवेंद्र फडणवीसांसह (Devendra Fadanvis) राज्यातील भाजप कोअर कमिटीची मंगळवारी दिल्लीत बैठक घेण्यात आली. त्यामध्ये, महाराष्ट्रातील पराभवावर भाष्य करत राज्यातील भाजप नेत्यांची चांगलीच शाळा वरिष्ठांनी घेतली. तसेच, महाराष्ट्रात कोणा एकट्याच्या मर्जीने पक्ष चालणार नाही, कोअर कमिटीला सोबत घ्या, अशा सूचनाच दिल्लीतील नेत्यांनी केल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची विनंती केली होती. मात्र, भाजपच्या वरिष्ठांनी त्यांना कायम राहण्याच्या सूचना करत, काम सुरुच ठेवा, असे सांगितले होते. त्यानंतर, मंगळवारी दिल्लीत झालेल्या बैठकीतून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी देवेंद्र फडणवीस आणि कोअर कमिटीला महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. ''कोण्या एका व्यक्तीच्या मर्जीने महाराष्ट्रात पक्ष चालू शकत नाही. कोअर कमिटीला सोबत घेऊनच पक्ष चालवावा लागणार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला थांबवायचं असेल, तर भाजपने एकत्रितपणे काम करायला हवं. महाराष्ट्रातील भाजपच्या सर्वच जुन्या नेत्यांनी सक्रीय करायला हवं,'' अशा शब्दात दिल्लीच्या नेत्यांनी महाराष्ट्रातील कोअर कमिटीच्या बैठकीत राज्यातील भाजप नेतृत्वाची शाळा घेतली. विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागा, आत्तापासूनच उमेदवारांना तयारी सुरू ठेवायला सांगा. लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या, त्या विधानसभा निवडणुकांमध्ये पुन्हा होऊ देऊ नका, महाराष्ट्रात भाजपची सत्ता आणायची आहे, अशाही सूचना भाजपच्या वरिष्ठांनी कोअर किमिटीला केल्या आहेत. 

सोशल मीडिया अधिक वापरा, विरोधकांना प्रत्युत्तर द्या 

महाराष्ट्र भाजपच्या सोशल मीडियावर केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याची माहिती आहे. कालच्या दिल्लीतील बैठकीत राज्यातल्या सोशल मीडियातील प्रचारासंदर्भातही चर्चा झाली. सोशल मीडियात भाजपविरोधात केलेल्या प्रचाराला उत्तर देण्यात राज्यातील नेते कमी पडल्याचे मत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने व्यक्त केले. तसेच, विरोधकांकडून जे मुद्दे सोशल माध्यमांमध्ये मांडले गेले आहेत, त्याला उत्तर देण्यात भाजपचे राज्यातील नेते कमी का पडले?, अशी विचारणा दिल्लीश्वरांनी भाजपच्या राज्यातील नेत्यांना केली आहे. तसेच, विधानसभा निवडणुकीत तरी विरोधकांना प्रत्युत्तर देण्याच्या दृष्टीनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा अधिक वापर करा, अशा सूचनाही राज्यातील नेत्यांना देण्यात आल्या आहेत. 

राज्यात भाजच्या 13 जागा घटल्या

लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळाला. गत 2019 च्या तुलनेत युतीच्या 25 जागा यंदा कमी झाल्या. तर, भाजपला केवळ 9 जागांवर विजय मिळाला असून 2019 च्या तुलनेत भाजपच्या 13 जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे, भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने मोठी नाराजी व्यक्त केली असून राज्यातील नेत्यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. महाविकास आघाडीकडून जो नेरेटीव्ह सेट करण्यात आला, तसेच मराठा आरक्षण, संविधान बदलणार, कांदाप्रश्न हेही मुद्दे प्रकर्षणाने या निवडणुकीत समोर आल्याचं दिसून आलं. त्याला सोशल मीडियातून प्रभावीपणे उत्तर देण्यात महाराष्ट्र भाजप कमी पडल्याची जाणीवही भाजप नेत्यांना करुन देण्यात आली आहे.  

विधानसभेच्या रोडमॅपवर बैठकीत चर्चा

राजधानी दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत महाराष्ट्रातील कोअर कमिटीची बैठक पार पडली. त्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीत जो काही निकाल आला, त्याच्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत कुठे आणि कशी मतं मिळाली,  कुठे चांगले यश मिळालं, कुठे कमी मतं मिळाली? त्याची कारण काय काय होती? निवडणुकीत कोण कोणत्या मुद्द्यांचा इम्पॅक्ट होता,  अशा सगळ्या गोष्टींची चर्चा या बैठकीत झाली. त्यासोबत येत्या विधानसभेचा रोडमॅपवर देखील एक प्राथमिक चर्चा केल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितले. तसेच, आगामी लोकसभा निवडणुकांसाठी अत्यंत मजबुतीने आपल्याला निवडणुकीत  पुढे कसे जाता येईल? या संदर्भातली सगळी कार्यवाही ही येत्या काळामध्ये आम्ही करणार आहोत, असेगी फडणवीस यांनी म्हटले. 

महाराष्ट्रात पक्षसंघटनेत कुठलाही बदल नाही

महाराष्ट्रातील नेतृत्वात कोणताही बदल होणार नाही, प्रदेशाध्यक्ष अथवा इतर कोणताही नेतृत्व बदल करण्यात येणार नाही. महायुती संपूर्ण ताकदीने राज्यातील विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याचं पियुष गोयल यांनी सांगितलं. 

महाराष्ट्रासाठी दोन केंद्रीयमंत्र्यांची नियुक्ती

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील पराभवानंतर केंद्रीय भाजपने दोन केंद्रीयमंत्र्यांना महाराष्ट्राची जबाबदारी सोपवली आहे. अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या आदेशान्वये आणि केंद्रीयमंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांना महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी पाठवण्यात आलं आहे. भूपेंद्र यादव यांना प्रभारी तर वैष्णव यांना सहप्रभारीपदाची नियुक्ती देत आगामी विधानसभा निवडणुकांवर भाजपने लक्ष केंद्रीत केलं आहे. भूपेंद्र यादव यांनी या अगोदर गुजरात आणि बिहारमध्ये प्रभारी म्हणून काम पाहिलं आहे. या दोन्ही राज्यात भाजपला मोठं यश मिळालं. त्यामुळेच, भाजपने आता महाराष्ट्राची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवली आहे.  

हेही वाचा

देवेंद्र फडणवीसच उपमुख्यमंत्री राहणार, राज्यात भाजपमध्ये कोणताही बदल नाही, विधानसभेला दिल्लीचा फुल्ल सपोर्ट