Devendra Fadnavis on Vidhan Sabha 2024 : देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहणार आहेत. त्यांच्या राजीनाम्याबाबत दिल्लीमध्ये बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं समोर आलेय. राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जोरदार फटका बसला होता, ही जबाबदारी स्वीकारुन देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यंत्रीपद सोडण्याचा प्रस्ताव भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला दिला होता. यावर आज चर्चा होईल, असा अंदाज बांधला जात होता. पण देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याबाबत बैठकीत कोणताही चर्चा झाली नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच उपमुख्यमंत्रीपदी राहणार असल्याचं आता निश्चित झालेय. 


विधानसभा निवडणुकीसाठी रोडमॅप आणि विधानसभेसाठी जागा वाटपाची चर्चा लवकर करणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. नवी दिल्लीमध्ये आज महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पिछेहाटीबाबत आणि आगामी विधानसभा निवडणुकीबद्दल महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवात साधला.  विधानसभेसाठी केंद्राकडून फूल सपोर्ट मिळणार असल्याचे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 


बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?


केंद्रीय नेतृत्वासोबत या ठिकाणी बैठक पार पडली. नुकत्याच महाराष्ट्रामध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत जो काही निकाल आला, त्याच्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत कुठे आणि कशी मतं मिळाली,  कुठे चांगले यश मिळालं, कुठे कमी मतं मिळाली? त्याची कारण काय काय होती? निवडणुकीत कोण कोणत्या मुद्द्यांचा इम्पॅक्ट होता,  अशा सगळ्या गोष्टींची चर्चा आजच्या बैठकीत झाली. त्यासोबत येत्या विधानसभेचा रोडमॅपवर देखील एक प्राथमिक चर्चा आम्ही केली.  कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या महायुतीच्या सर्व घटक पक्षांसोबत ही विधानसभा कशी निवडून येता येईल, या संदर्भातला एक रोड मॅप आम्ही तयार केला आहे. याबाबत आता लवकरच घटक पक्षांसोबत देखील चर्चा करणार आहोत. अत्यंत मजबुतीने आपल्याला निवडणुकीत  पुढे कसे जाता येईल? या संदर्भातली सगळी कारवाई ही येत्या काळामध्ये आम्ही करणार आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 


राज्यात कोणताही नेतृत्व बदल नाही -


महाराष्ट्रातील नेतृत्वात कोणताही बदल होणार नाही, प्रदेशाध्यक्ष अथवा इतर कोणताही नेतृत्व बदल करण्यात येणार नाही. महायुती संपूर्ण ताकदीने राज्यातील विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याचं पियुष गोयल यांनी सांगितलं. 




भाजपा कोअर कमिटी राज्यातील नेत्यांचीही बैठक - 


केंद्रीय भाजपा कोअर कमिटीची बैठक आधी पार पडली. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची हायकमांड सोबत राज्यातील मुद्द्यावर चर्चा झाली. आगामी विधानसभा निवडणुकीबाबत यामध्ये रणनीती ठरवण्यात आली. हायकमांडची बैठक झाल्यानंतर राज्यातील भाजप नेत्यांची वेगळी बैठक झाली. भाजप मुख्यालयात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यातील नेत्यांची बैठक झाली.