परभणी : मराठवाड्यातील लोकसभा निवडणुकीत यंदा मराठा आरक्षण, मनोज जरांगे पाटील फॅक्टरने काम केल्याचं निवडणूक निकालातून दिसून आलं. बीडमध्ये अत्यंत अटीतटीची निवडणूक झाल्यानंतर परभणीतही महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजय बंडू जाधव यांच्या विजयानंतर समर्थकांनी जल्लोष केला. विजयी मिरवणूकपूर्व बंडू जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, त्यांनी महादेव जानकर यांच्यावरही टीका केली. दरम्यान, निवडणूक निकालापूर्वीच बंडू जाधव यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मला फायदा झाल्याचं म्हटलं होतं. त्यातच, जाधव यांच्या विजयी मिरवणुकीत मनोज जरांगेंचे फोटो झळकल्याचं पाहायला मिळालं. 


महाविकास आघाडीचे परभणीतील उमेदवार संजय जाधव हे 1 लाख 21 हजार मताधिक्याने आघाडीवर होते, त्यामुळे त्यांच्या विजयाची केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे. यावेळी त्यांनी मतमोजणी कक्षाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर, विजय निश्चित झाल्याचा आनंद साजरा करत पत्रकारांशी संवाद साधला.  शंभर कोटी रुपयाची उलाढाल महादेव जाणकरांकडून करूनही उपयोग झाला नाही. केवळ जातीवर आधारित निवडणूक लढवून विजयी होता येत नसल्याचा टोला संजय जाधव यांनी भाजप अन् महादेव जानकर यांना लगावला आहे. दरम्यान, संजय जाधव यांच्या समर्थकांकडून जल्लोष साजरा करण्यात येत असून, महाविकास आघाडीच्या नेत्यांची विजय मिरवणूक शहरात काढण्यात आली आहे. यावेळी विजयी मिरवणुकीत काही मराठा बांधवांनी मनोज जरांगे यांचे फोटो झळकावले. मराठा आरक्षण आंदोलन व मनोज जरांगेंच्या फॅक्टरचा लाभ परभणीतील महाविकास आघाडीच्या उमेदवारास झाल्याचे आंदोलकांनी सूचवलं आहे.


जानकरांकडून पराभव मान्य


परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय जाधव यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. 1 लाख 21 हजारांच्या मताधिक्याने संजय जाधव आघाडीवर होते. त्यामुळे, महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांचा पराभव निश्चित असून जानकर यांनीही आपला पराभव मान्य केला आहे. दुसरीकडे शहरातून संजय जाधव यांची विजयी रॅली सुरू झाली असून रॅलीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. 


पराभवानंतर काय म्हणाले जानकर


परभणीच्या मतदारांचे मी आभार मानतो, जनतेला दिलेला कॉल मी मान्य करतो. महायुतीच्या सर्व नेत्यांचे आभार मानतो. निवडणुकीत हार-जीत होत असते. शंकर महादेवांना सुद्धा विष प्राशन करून पृथ्वीवर राज्य करायचं होतं, त्यांनी हा समतेचा झेंडा उभा करण्याचा प्रयत्न केला. सव्वीस दिवसात परभणीकरांनी जे प्रेम मला दिलं, त्याचे मी आभार मानतो. मित्रपक्ष भाजप, शिवसेना, अजित दादांची राष्ट्रवादी आणि आरपीआय रासपच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. विकासाच्या दृष्टिकोनातून परभणीमध्ये मी सतर्क राहील, असे महादेव जानकर यांनी निवडणूक निकालानंतर म्हटले आहे.  


मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा फायदा 


2019 च्या परभणी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे बंडू जाधव हे 42 हजार मताधिक्यांनी निवडून आले होते. या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर होते. बंडू जाधव यांना 5.38 लाख मतं होती तर विटेकरांना 4.96 लाख मतं मिळाली. राज्यात झालेल्या चुरशींच्या निवडणुकांपैकी ही एक निवडणूक ठरली होती. यंदा राजेश विटेकर हे महादेव जानकर यांच्यासाठी प्रचार करत होते. मात्र, येथील मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी असा जातीय संघर्ष पाहायला मिळाला. स्वत: बंडू जाधव यांनीच याबाबत कबुली दिली. मनोज जरांगे यांचा फायदा मला व बीडमध्ये बजरंग सोनवणे यांना झाल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळे, मराठा आरक्षण आंदोलनाचा फायदा बंडू जाधव यांना झाल्याचे बोलले जाते.  


शिवसेना फुटीनंतर पक्षनिष्ठ कायम


शिवसेना फुटीनंतर संजय जाधव हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राहिले. त्यामुळे, परभणीतून बंडू जाधव यांनात उमेदवारी देण्यात आली. अद्यापही ठाकरेंच्या शिवसेनेला आणि बाळासाहेब ठाकरेंना मानणारा वर्ग या मतदारसंघात आहे, त्याचा फायदा निश्चितचपणे त्यांना होऊ शकतो, असं येथील राजकीय तज्ज्ञ सांगतात.


परभणी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे 4 आमदार 


परभणी लोकसभा मतदारसंघात जालना जिल्ह्यातील घनसावंगी आणि परतूर हे विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामुळे, हा मतदारसंघ परभणी व जालना ह्या दोन्ही जिल्ह्यांचा आहे. या शिवाय जिंतूर, परभणी, पाथरी आणि गंगाखेड या 4 विधानसभा मतदारसंघाचा समावेश परभणी मतदारसंघात आहे. या 6 मतदारसंघांपैकी जिंतूर व परतूर या 2 मतदारसंघात भाजपचे, गंगाखेड मतदारसंघात रासपचे, घनसांगवीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे, पाथरीत काँग्रेसचे आमदार आहेत, तर परभणी मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहे. म्हणजेच, भाजप वगळता इतर 4 पक्षाचे एक-एक आमदार आहेत. तर महायुतीचे 4 आमदार असल्याचे दिसते.