छत्रपती संभाजीनगर : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या बीडमधील (Beed) वैद्यनाथ साखर कारखान्यावर (Vaidyanth Sakhar Kharkhana) जीएसटी (GST) विभागाने जप्तीची कारवाई केली आहे. वैजनाथ सहकारी साखर कारखान्याने साखरेचा जीएसटी न भरल्याने ही कारवाई केली असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, असे असलं तरीही यात काही राजकारण (Politics) आहे का? याची चर्चा सुद्धा होताना पाहायला मिळते आहे.
भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी 23 वर्षांपूर्वी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली होती. अल्पावधीमध्येच मराठवाड्यातील उसाचे विक्रमी गाळप करणारा साखर कारखाना म्हणून वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा गौरव झाला. पण, गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झालं आणि त्यानंतर या साखर कारखान्याला उतरती कळा लागली.
गेल्या दहा वर्षांच्या काळात हा सहकारी साखर कारखाना तीन वर्ष बंद होता. पावसाअभावी पडलेल्या दुष्काळाचा फटका राज्यातील अनेक साखर कारखान्याला बसला, त्यात वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना सुद्धा दुष्काळामुळे बंद ठेवावा लागला. या साखर कारखान्यावर गोपीनाथ मुंडे हयात असतानाच अनेक बँकांचे कर्ज होते. मात्र, मुंडेंच्या पश्चात साखर कारखान्याचे अर्थकारण बिघडले. मध्यंतरीच्या काळामध्ये धनंजय मुंडे यांनीही वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात विरोधाची भूमिका घेतली. या सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा व्यवस्थापनाच्या विरोधामध्ये आंदोलन केली. अर्थकारणासोबतच व्यवस्थापन बिघडलेल्या या सहकारी साखर कारखान्याला केंद्र सरकारने मदत करावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली होती. मात्र, त्यांच्या मागणीला काही यश आले नाही.
आठ कोटींचा जीएसटी भरला नसल्याचा आरोप?
कोरोनाच्या काळातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने विकलेल्या साखरेवरील अंदाजे आठ कोटी रुपयांचा जीएसटी भरण्यात आला नसल्याचा आरोप झाला. त्यामुळे या प्रकरणी पहिली नोटीस एप्रिल महिन्यामध्ये साखर कारखान्याला पाठवण्यात आली. विशेष म्हणजे त्यानंतर वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना प्रशासन आणि जीएसटी कार्यालयात यासंदर्भातली चर्चा चालूच होती. राज्यातील इतर साखर कारखान्याप्रमाणे वैद्यनाथलाही केंद्राकडून मदत मिळेल अशी अपेक्षा पंकजा मुंडे यांना होती. पण, प्रत्यक्षात त्यांची अपेक्षा फोल ठरली.
शिवशक्ती परिक्रमा यात्रा काढल्याने कारवाई?
पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी शिवशक्ती परिक्रमा यात्रा काढली. या यात्रेला महाराष्ट्रातील दहा ते अकरा जिल्ह्यात भरभरून प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच भाजपकडून पंकजा मुंडेंच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर कारवाई केली जात असल्याची राजकीय चर्चा पाहायला मिळतेय. पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस या भाजपातील दोन नेत्यांमधील मतभेद कायम चर्चेत राहिले आहेत. त्यामुळेच या साखर कारखान्यावरील कारवाईमध्ये सुद्धा राजकारण होते का? असा प्रश्न आता विचारला जातोय.
इतर महत्वाच्या बातम्या: