Pankaja Munde on Uddhav Thackeray Phone Call Rumors: उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde ) यांना फोन केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यावरच स्वतः आता पंकजा मुंडे यांनी खुलासा केला आहे. त्या म्हणाल्या आहेत की, ''मागील तीन दिवसांपासून मी पुण्यात मुक्काम ठोकून आहे. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा मी प्रचार करत आहे. ज्यांना माझा प्रचार पाहावत नाही ते अशा प्रकारच्या अफवा पसरवत आहेत. मी करत असलेला प्रचार ज्यांना आवडत नाही, तेच अशा प्रकारच्या बातम्या करत आहेत.'' कसबा पोटनिवडणुकीत (Pune By-Elections) आज कसबा मतदारसंघात हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी रोडशो आयोजित करण्यात आला होता. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या असं म्हणल्या.


Pankaja Munde : 'भाजपच्या जन्मापासून गिरीश बापट भाजपसोबत'


गिरीश बापट यांच्याबद्दल बोलताना पंकजा मुंडे (Pankaja Munde ) म्हणाल्या की, ''भाजपच्या जन्मापासून गिरीश बापट भाजपसोबत आहेत. आजवर त्यांनी पक्षासोबत काम केलं. विधानसभेत काम केलं आहे, ते लोकसभेत गेले. एवढं आयुष्य पक्षासाठी वेचल्यानंतर निवडणुकीत भाग घेण्याची उत्सुकता त्यांनाही असेल. हेमंत रासनेंना आशीर्वाद देण्याची त्यांचीही इच्छा असेल तर यात वावगे काय.'' त्या म्हणल्या की, ''भारतीय जनता पक्षात जास्त दिग्गज आहेत. परंतु आम्ही सर्व कार्यकर्ते म्हणून हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी आलो आहोत. हेमंत रासने यांना विजयी करण्यासाठी भाजपला विजयी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी कार्यकर्ते म्हणून आलो आहोत.''


पंकजा मुंडे (Pankaja Munde ) पुढे म्हणल्या की, ''कसबाच नाही तर प्रत्येक निवडणुकीकडे आम्ही चुरशीची निवडणूक म्हणूनच पाहतो. या निवडणुकीत आम्हाला जास्तीत जास्त मते घ्यायची आहेत. निवडणूक चुरशीची जरी असली तरी आम्हाला विजयाबद्दल अजिबात शंका नाही. जास्तीत जास्त मते घेऊनच आम्हाला विजयी व्हायचे आहे.''


अजित पवारही प्रचारसाठी पुण्यात आहे. याबद्दल बोलताना त्या (Pankaja Munde ) म्हणल्या की, ''अजित पवार आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले आहेत. त्यामुळे आपल्या उमेदवाराचा प्रचार ते चांगल्या प्रकारेच करणार. परंतु आमचा आत्मविश्वास अतिशय दांडगा आहे. परिस्थिती अतिशय सकारात्मक आहे. सरकार आमचं आहे. लोक देखील विजयाकडे वाटचाल करणारी आहे. आपल्याला विकास मिळेल, या भावनेतून लोक देखील आम्हाला निवडून देतील. राज्यातली सत्ता आणि स्थानिक सत्ता जेव्हा एकत्र मिळून काम करतात तेव्हा विकास हा नक्कीच होत असतो.''