Pankaja MUnde : अहमदनगर : राज्यात आज दसरा मेळाव्यांच्या माध्यमातून राजकीय नेत्यांच्या तोफा धडाडत आहेत. बीड जिल्ह्यातील नारायणगडावर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांचा दसरा मेळावा मोठ्या उत्साहात व गर्दीच्या साक्षीने संपन्न झाला. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला मेळाव्यातून इशारा दिलाय. तर, दुसरीकडे पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात पाथर्डी तालुक्यातील भगवानगडावरही मेळावा संपन्न झालाय. या मेळाव्यातून पंकजा मुंडेंनी जमलेल्या भाविक न नागरिकांना भावनिक साद घातली. तसेच, सध्याच्या जातीय राजकारणवरही भाष्य केलंय. यावेळी नाव न घेता त्यांनी मनोज जरांगेंना अप्रत्यक्षपणे लक्ष केलं. आम्हाला अधिकाऱ्याचा सीआर पाहूनच त्याला काम द्यायचंय, त्याची जात बघून देणाऱ्याची औलाद गोपीनाथ मुंडेंची (Gopinath Munde) नाही. आम्हाला काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभं राहायचंय, जातीवर स्वार होणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहायचं नाही, असे पंकजा मुंडेंनी म्हटल्या.
छत्रपतींच्या घराण्यानेही गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम केलंय. माझ्यावरही छत्रपतींच्या घराण्यातून प्रेम केलं जातंय, छत्रपती उदयनराजेंनी त्यांच्या देवघरात माझ्या हातून पूजा केली. उदयनराजेंनी घरात एका ठिकाणी मला नेऊन दाखवलं, तिथं गोपीनाथ मुंडेंसाहेबांचा फोटो होता. पण, आज काय झालंय समाजाला, एखाद्याला एखाद्या गाडीने उडवलं तर, लोकं म्हणतात, गाडीच्या ड्रायव्हरची जात काय आणि उडवलं त्याची जात काय. आज एखाद्या मुलीवर अत्याचार झाला, तर लोक विचारतात त्या नराधमाची जात काय आणि मुलीची जात काय, हा असा समाज घडविण्यासाठी आम्ही आमच्या आयुष्यातील वर्षे खर्च केली नाहीत.
आम्हाला अधिकाऱ्याचा सीआर पाहूनच त्याला काम द्यायचंय, त्याची जात बघून देणाऱ्याची औलाद गोपीनाथ मुंडेंची नाही. आम्हाला काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभं राहायचंय, जातीवर स्वार होणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहायचं नाही, असे म्हणत नाव न घेता मनोज जरांगे यांना टोला लगावला. मला या देशात आणि राज्यात एखाद्यानं अधिकाऱ्याचं नाव घेऊन फाईल आणली की ते म्हणतात, ताई आपला जवळचा आहे, आपला पाहुणा आहे. पण, त्याच्यावर विनयभंगाची केस असेल तर कसला पाहुणा?, असे म्हणत पंकजा मुंडेंनी सध्याच्या जातीय राजकारणावर भाष्य केलंय.
राज्यात कुठंही अन्याय झालं तर येणार
शिवरायांनी मावळ्यांची मोठ बांधली म्हणून स्वराज्य स्थापन झालं. लाडकी बहीण आज म्हणतात पण लाडक्या बहिणींना शिकवण्याचा आणि ताकद देण्याचे काम सवित्रीबाईंनी केलं. गरिबांसाठी माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण खर्च केलाय. मी पडले म्हणून मी थकले असं तुम्हाला वाटतं का? नाही ना? आता घोडा मैदान दूर नाही. धनुभाऊ आम्ही परळी तर करणारचं आहोत, पण राज्यात कुठंही अन्याय केला तर तिथं ही येणार. मी तुमच्याकडे येणार आहे. कारण, संपूर्ण राज्यातून आलेले अठरा पगड जातींचे माझे बांधव आहेत. मी महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यात जाणार आहे, येऊ ना? आपल्याला आपला डाव खेळायचा आहे ना?.
मतदान केल्याशिवाय ऊस तोडायला जायचं नाही
मतदान केल्याशिवाय कोणीही ऊस तोडायला जायचं नाही, हे वचन मला द्या. ऊस तोड कामगारांचे जीवन बदलल्याशिवाय शेवटचा श्वास घेणार नाही, असेही पंकजा मुंडेंनी म्हटलं. पंकजा मुंडे खोटं बोलते काय? मी कोणालाही घाबरत नाही. मी अंधारात कोणाला जाऊन भेटत नाही, मला विकास करायचा आहे, गावागावात रस्ते करायचे आहे, मंत्री असताना ही हे सगळं केलं, असे म्हणत पंकजा मुंडेंनी निवडणूकपूर्व महाराष्ट्र दौऱ्याच घोषणाच एकप्रकारे केलीय.