मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मोठा फटका बसला असून महाविकास आघाडीने (Mahavikas aghadi) मोठं यश मिळवल्याचं दिसून आलं आहे. महाविकास आघाडीने 30 जागांवर विजय मिळवला असून सांगलीतून एक अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. त्या तुलनेत महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे, या पराभवाची जबाबादारी आपण स्वीकारत असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) उपमुख्यमंत्रीपदावरुन पायउतार होणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर फडणवीसांनी आता पुन्हा जोमाने कामाला सुरुवात ेकली आहे. त्यानुसार, आज भाजप आमदारांच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी, पराभवाची कारणे व विश्लेषण करताना 11 जागा अशा आहेत, जिथं केवळ 5 टक्क्यांपेक्षा कमी मतांनी आपण पराभूत झालेलो आहोत, असे गणितही फडणवीसांनी सांगितलं.


यंदाच्या निवडणुकीत आपण तीन पक्षाशी लढत नव्हतो, तर 4 पक्षांविरुद्ध लढत होतो. तो चौथा पक्ष म्हणजे खोटा नरेटीव्ह होय. आपण, केवळ तीन पक्षांविरुद्ध लढत होतो, पण हा चौथा पक्ष जो होता त्याच्याशी आपण लढलोच नाहीत. आपण पाहिलं संविधान बदलणार हा नेरेटीव्ह इतक्या खालपर्यंत गेला की, आपण परिणामकारकरित्या त्यास काऊंटर केलं नाही. म्हणून पहिल्या 3 टप्प्यात आपणास केवळ 4 जागा मिळाल्या आहेत. पहिल्या तीन टप्प्यातील निवडणुकीत 24 जागांपैकी केवळ 4 जागा आपल्याला जिंकता आल्या आहेत. कारण, त्यांनी चुकीचा व खोटा नेरेटीव्ह तयार केला होता. आपल्या सगळ्या जागा ह्या दुसऱ्या 24 जागांमध्ये आल्या आहेत. कारण, मग आपण परिणामकाररित्या काऊंटर केलं. दलित व आदिवासी समाजात मोठ्या प्रमाणात हा नेरेटीव्ह तयार करण्यात आला. मात्र, हा निवडणूक एका निवडणुकीपुरतीच असते, असे म्हण नेरेटीव्हविरुद्धच्या लढाईत आपण कमी पडल्याचं फडणवीसांनी सांगितलं. दरम्यान, देशात पुढील एक वर्ष भारताच्या संविधानाचा महोत्सव साजरा केला जाणार आहे, असेही फडणवीसांनी सांगितलं. दुसरा नेरेटीव्ह असा तयार करण्यात आला तो म्हणजे पक्ष फोडाफोडीचा. मात्र, तोही चुकीच्या पद्धतीचा असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. 


दुसरं नेरेटीव्ह काय तयार झालं, हेही मी सांगतो. मराठवाड्यामध्ये मराठा समाजाचा नेरेटीव्ह तयार केला. मराठा समाजाला दोन्हीवेळी आरक्षण आपण दिलं, सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा, यांसह अनेक गोष्टी आपल्याच काळात झाल्या. मात्र, ज्यांनी 1980 पासून मराठा आरक्षणाला विरोध केला, त्यांच्याकडे मतं गेली. याचा अर्थ हा नेरेटीव्ह तयार करण्यात ते यशस्वी झाले आहेत. मात्र, ते काही प्रमाणातच यशस्वी झाले. कारण, महायुतीच्या उमेदवारांना 43 टक्के मतं पडली आहेत, असे गणित फडणवीसांनी सांगितलं.  


महाराष्ट्रातील उद्योग पळवला असा एक नेरेटीव्ह तयार केला. तसं पाहिलं तर 2022 आणि 2023 मध्ये महाराष्ट्र गुंतवणुकीत आपण पहिल्या नंबरवर आणला. उद्धव ठाकरेंच्या काळात गुजरात पहिल्या क्रमांकावर होता, तर कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर होता. मात्र, आपल्या कार्यकाळात गुजरात, दिल्ली, कर्नाटक यांची एकत्र बेरीज केली तर महाराष्ट्रात झालेली गुंतवणूक त्यांच्यापेक्ष जास्त आहे. मात्र, रोज खोटं बोलून उद्योग पळवले हे खोटं सांगण्यात आलं, असे फडणवीस यांनी सांगितलं. 


उबाठाला मुंबई, ठाण्यात एकही जागा नाही


उद्धव ठाकरेंना फार सहानुभूती आहे, असा एक नेरेटीव्ह तयार करण्यात आला. पण, उद्धव ठाकरेंना जर सहानुभूती होती तर ती कोकण आणि मुंबईत दिसायला हवी होती ना. मात्र, ठाण्यापासून ते कोकणच्या शेवटच्या टोकापर्यंत उबाठाला एकही जागा मिळाली नाही. कोकण, ठाणे, पालघर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात एकही जागा उबाठाला मिळाले नाही. मुंबईच्या ज्या जागा मिळाल्या त्या कोणाच्या भरोशावर मिळाल्या. मुंबईत मराठी माणसांनी यांना मत दिलं नाही, कारण मराठी माणसांनी मतं दिली असती तर आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात केवळ 6 हजारांचा लीड आहे. मराठी माणसांनी मतदान केलं असतं तर शिवडीमध्ये 30 ते 40 हजारांचा लीड त्यांनी घ्यायला हवा होता. याचा अर्थ मराठी माणूस त्यांच्यासमवेत गेला नाही. त्यांनी केवळ एका विशिष्ट समाजाच्या मतांच्या आधारावर त्यांनी मतं घेतली, असे गणित फडणवीसांनी सांगितलं. तसेच, खासदार बंडू जाधव यांचा उल्लेख करत मुस्लीम समाजाचं मतदान त्यांना मिळाल्याचेही फडणवीस म्हणाले.  


अमितभाई म्हणाले, महाराष्ट्राची ब्लू प्रिंट तयारू करू 


मी अमितभाईंना भेटल्यानंतर, सध्या तुमचं काम सुरू ठेवा असं अमित भाईंनी सांगितलं. तसेच, महाराष्ट्राची ब्लू प्रिंट आपण तयार करू, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तसेच, मी 1 मिनिट देखील मी शांत बसणार नव्हतो आणि बसणार नाही.