अहमदनगर : देशातील लोकसभा निवडणुकांचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असून निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एकीकडे निकालाची उत्कंठा वाढली असून दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्य भूमिकेकडेही लक्ष लागले आहे. कारण, निवडणूक निकालानंतर आपण पुन्हा मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार असल्याचं जरांगे यांनी यापूर्वीच जाहीर केलं आहे. त्यामुळे, अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे (Manoj jarange) यांच्या उपोषणासाठी मंडप टाकण्याचं काम सुरू आहे. मात्र, अंतरवाली सराटी गावातील ग्रामस्थांनीच मनोज जरांगेंच्या आंदोलनास विरोध केल्याचं दिसून आलं. यासंदर्भात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांन विचारले असता, त्यांनी नाव न घेता मनोज जरांगे यांच्यावर टीका केली.   


महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज संगमनेर तालुक्यातील निझरणेश्वर येथे महादेवाला अभिषेक करण्यात आला आहे. लोकसभा निवडणूक निकालापूर्वी विखे पाटलांनी देव दर्शन करुन मुलगा सुजय विखे पाटील यांच्या विजयासाठी देवाला साकडं घातलं. त्यानंतर, माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध प्रश्नावर उत्तरं दिली. महाराष्ट्रात महायुतीला 40 जागा मिळतील, असेही ते म्हणाले. तर, मराठा आरक्षणाचे आंदोलन हे पॉलिटीकल स्कोअरिंग करणारं असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.  


मराठा आरक्षणाच्या बाबतीत ही वाटचाल पॉलिटीकल स्कोअरिंग करणारी आहे. समाजाचा आधार घेऊन उमेदवाराच्या विरोधात प्रक्षोभ करण्याचा प्रयत्न झाल्याचं चित्र लोकसभा निवडणुकांवेळी दिसल्याचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं. तसेच, नाव न घेता मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर भाष्य करताना टीकाही केली. मराठा समाजाचा फक्त राजकारणासाठी वापर होतोय हे आता आमच्या समाजातील तरुणांना समजत आहे. राज्यात 58 मोर्चे निघाले होते, तेंव्हा हे आत्ता आंदोलन करणारे कुणीच नव्हते. आज जे आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत, ते कुठे होते?, असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे. तसेच, आत्ताचे आंदोलन भटकटत चाललं आहे. जनतेच्या हे लक्षात आल्यानेच जरांगे यांच्या आंदोलनाला विरोध होतोय, असेही विखे पाटील यांनी म्हटले. 


महायुतीच्या 40 जागा निवडून येतील


अहमदनगर जिल्ह्यातील दोन्ही जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील. महायुतीकडे विश्वनेता मोदींचे नेतृत्व आहे. मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचे, ही जनतेने खूणगाठ बांधली आहे. राज्यात जनतेच्या मनातलं सरकार काम करतंय. जनता देशाच्या हिताचा निर्णय करील, असे मत विखे पाटील यांनी म्हटले. तसेच, राज्यात महायुतीचे किमान 40 उमेदवार निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.