Maharashtra VidhanSabha Election: लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) वारे वाहू लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभेसाठी जंगी तयारी केली जात आहे.पुण्यात झालेल्या शरद पवार गटाच्या इच्छुकांच्या मुलाखतीत सोलापूर जिल्ह्यातील 11 पैकी 10 विधानसभा मतदार संघातून 61 जणांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. तर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून एकही उमेदवार इच्छुक नसल्याचं दिसून आलं.


अक्कलकोट विधानसभा वगळता सोलापुरात जिल्ह्यातील इतर 10 विधानसभा मतदार संघातून 61 जणांनी उमेदवारी मागितली आहे. यामध्ये माजी आमदारासह अनेक दिग्गजांचा समावेश आहे. दक्षिण सोलापुरातून सिद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी चेअरमन धर्मराज काडादी, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष सुनीता रोटे यांनी मुलाखत दिली आहे. तर शहर मध्यसाठी माजी नगरसेवक तौफिक शेख, प्रमोद गायकवाड, यु. एन. बेरिया यांनी इच्छा व्यक्त केली. सोलापूर शहर उत्तरसाठी माजी महापौर महेश कोठे, माजी उपमहापौर मनोहर सपाटे यांनी उमेदवारी मागितली आहे. तर मोहोळ राखीव विधानसभेसाठी माजी आमदार रमेश कदम आणि काँग्रेसचे कार्यककर्ते असलेले अमोल उर्फ रॉकी बंगाळे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांची कन्या कोमल साळुंखे आणि मुलगा अभिजित ढोबळे यांनी शरद पवार गटाच्या तुतारीकडून तिकीट मागितल्याची माहिती समोर येत आहे.


धर्मराज काडादी यांनी मागितली दक्षिण सोलापूरची उमेदवारी-


सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी शरद पवारांकडे दक्षिण सोलापूरची उमेदवारी मागितली. पुण्यात झालेल्या इच्छुकांच्या मुलाखती दरम्यान धर्मराज काडादी यांनी तुतारीकडून उमेदवारीची मागणी केली. धर्मराज काडादी यांच्या राजकीय एन्ट्रीमुळे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. धर्मराज काडादी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीकडून इच्छुक आहेत. लोकसभेत निवडणुकीत धर्मराज काडादी हे काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारात सक्रिय होते. मात्र पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या इच्छुकांच्या मुलाखतमध्ये धर्मराज काडादी उपस्थित राहिल्याने दक्षिण सोलापूरची जागा नेमकी कोणाकडे जाणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी-


पुणे येथील निसर्ग मंगल कार्यालयात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विविध मतदारसंघाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. माढा विधानसभेसाठी संजय कोकाटे, शिवाजी कांबळे, संजय पाटील घाटणेकर, बाळासाहेब पाटील, नितीन कापसे अशा जवळपास दहा जणांनी मुलाखती दिल्या आहेत. यात आमदार बबन शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे यांनी देखील मुलाखत दिल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय अशी अभिजीत पाटील यांची ओळख आहे. आता त्यांनी माढा विधानसभेसाठी शरद पवार गटाकडे उमेदवारीसाठी मुलाखत दिली आहे. त्यामुळे अभिजित पाटील यांनी फडणवीसांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला की काय अशी चर्चा सध्या सुरु आहे.


संबंधित बातमी:


फडणवीस मतदारसंघात मात्र भाजपचा माजी आमदाराची दांडी; गडी थेट सोलापुरात उगवला, अजितदादांच्या शेजारी बसून केली चर्चा, नक्की काय घडलं?