गोंदिया : राज्यातील लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मोठा फटका बसला. त्यात, सर्वात कमी जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीला रायगड लोकसभा मतदारसंघातील एकमेव जागा जिंकता आली. त्यामुळे, राष्ट्रवादीच्या नेत्यांची घोर निराशा झाली. तरीही पराभवाने खचायचं नसतं, आता विधानसभेच्या तयारीला लागा अशा सूचना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केल्या आहेत. त्यामुळे, महायुतीतमध्ये आता विधानसभेच्या जागावाटपावरुन खलबतं सुरू होणार आहेत. त्यातच, राष्ट्रवादीकडून 80 जागांवर दावा करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पक्षाच्या मेळाव्यातून 80 जागांवर दावा केला होता. आता, प्रफुल पटेल (Prafull Patel) यांनीही 80 ते 90 जागांवर दावा केला आहे.  


लोकसभा निवडणूक संपल्यानंतर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अशातच महायुतीमध्ये देखील जागा वाटपाचे गणितं जुळू लागले आहेत. गोंदियामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत प्रफुल पटेल यांना जागावाटपासंदर्भात विचारले असता जुन्या राष्ट्रवादी पक्षाकडून आमच्याकडे एकूण 57 आमदार होते. ही गोष्ट लक्षात घेता आम्ही विधानसभेत 85 ते 90 जागा मागणार आहोत, असे प्रफुल पटेल यांनी म्हटले. त्यामुळे, महायुतीत राष्ट्रवादीकडून थेट 85 ते 90 जागांवर दावा करण्यात आल्याचे स्पष्ट झालं आहे. यापूर्वी छगन भुजबळ यांनीही 80 ते 90 जागा काय द्यायच्या त्या द्याव्यात आणि विषय संपवावा, असे म्हटले होते. तसेच, शिवसेनेला जेवढ्या जागा दिल्या जातील, तेवढ्याच जागा राष्ट्रवादीला द्याव्यात, असेही त्यांनी म्हटले होते. त्यामुळे, महायुतीत आता जागावाटपावरुन पुन्हा राजी-नाराजी होते की काय, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.  


दरम्यान, लोकसभा निवडणुकांपूर्वी जागावाटपातही चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली. सातारा आणि नाशिकच्या जागेवरुन चांगलाच वाद रंगला होता, त्यामुळे नाशिकची जागा जाहीर करण्यास महायुतीला उशीर झाला. नाशिकची जागा उशिरा जाहीर झाल्यामुळेच आमचा पराभव झाला, असेही महायुतीमधील शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून म्हटले जात आहे. त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुकांसाठीचं जागावाटप तरी लवकर होईल का, हा खरा प्रश्न आहे. 


मंत्रिपद मलाच मिळणार


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्रातून राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, एनसीपीला राज्यमंत्रीपद देऊ केल्यामुळे त्यांनी ते नाकारत कॅबिनेट मंत्रीपद पाहिजे अशी मागणी केली होती. त्यानंतर भाजपने आम्ही विचार करू असं म्हटलं आहे. त्यातच, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेण्यात आलं. त्यामुळे, सुनेत्रा पवार यांना राज्यमंत्रीपद देण्यात येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या कोट्यात जर कॅबिनेट मंत्री आलं तर ते मलाच मिळणार असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. योग्य वेळ आल्यावर योग्य निर्णय होईल, असेही पटेल यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले. 


लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल


गेल्या अनेक दिवसांपासून महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार थांबलेला आहे. त्यासंदर्भात प्रफुल पटेल यांना विचारले असता, लवकरच महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार होणार आणि जी पद खाली आहेत त्या ठिकाणी विस्तार करण्या येईल. तसेच, आता विधानसभा निवडणुकांसाठी राहिलेल्या महिन्यात चांगल्या जोमाने काम करता येईल, असेही पटेल यांनी सांगितले. 


विधानसभेला चित्र बदलेल


देशामध्ये नुकताच पार पडलेले लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीए सरकारला अपेक्षित यश आलं नाही. महाराष्ट्रात देखील परिस्थिती वेगळीच राहिली. मात्र, आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये परिस्थिती काहीतरी वेगळी राहील, विधानसभा निवडणुकीमध्ये पिक्चर बदलेल असेही पटेल यांनी म्हटलं. 


चुकीच्या प्रचाराचा फटका एनडीएला बसला


नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भंडारा-गोंदिया लोकसभेवर महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांचा पराभव झाला. येथून काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. प्रफुल पटेल लोकसभा निवडणुकीनंतर आज पहिल्यांदाच गोंदियात आले असता त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचे अभिनंदन केले. तसेच, लोकांच्या समस्या दूर करायला पाहिजे असेही म्हटले. महाराष्ट्रात NDA मागे राहण्याचे कारण म्हणजे विरोधकांनी चुकीचा प्रचार केला, त्यामुळे अनेक ठिकाणी आम्ही मागे राहिलो, अशी खंतही प्रफुल पटेल यांनी व्यक्त केली.