सोलापूर : निवडणूक (Election) आयोग झोकांड्या खातोय की भेलकांडतोय हेच सध्या महाराष्ट्राला समजत नाही. कधी कोणाच्या निवडणुका थांबवतोय तर कधी अजून काय करतोय. निवडणूक आयोगावर एवढी कोणाची दहशत आहे, निवडणूक फक्त भाजपनेच लढवायचे अगदी त्यांच्या मित्र पक्षांनाही अडवायचे काम सुरू आहे. सर्वत्र काळोख असून लोकशाही संपलेली आहे, अशी कडवट टीका माळशिरसचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते उत्तम जानकर (Uttam jankar) यांनी केली आहे. गेल्या 8 दिवसांत निवडणूक आयोगाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाने राज्यातील निवडणुकांवर मोठा परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाची हे निर्णय संवैधानिक शिस्त न पाळणारे असल्याचं उच्च न्यायालायाने देखील म्हटलं आहे.
राज्यात 246 नगरपालिका आणि 48 नगरपंचायत निवडणुकांसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार होते. मात्र, तत्पूर्वी 72 तास अगोदर निवडणूक आयोगाने नगरपालिका निवडणुकांच्या काही प्रभागातील व 24 नगराध्यक्षपदाच्या निवडणुका पुढे ढकलल्याने उमेदवार आणि कार्यकर्त्यांची मोठी गोची झाली. त्यानंतर, उर्वरीत नगरपालिकेच्या निवडणुकांसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान झाले. मात्र, ज्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या, त्याच्या निकालाची तारीख 21 असल्याने 2 डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकांच्या निकालाची तारीखही 21 करण्यात आली. नागपूर खंडपीठाने याबाबत निवडणूक आयोगाला निर्देश दिले होते. त्यामुळे, पुन्हा एकदा निवडणूक आयोगाचा गलथान कारभार समोर आला आहे. त्यावरुन, आता आमदार उत्तम जानकर यांनी निवडणूक आयोगावर खोचक शब्दात टीका केली. तसेच, राज्यातील लोकशाही संपली असल्याचंही त्यांनी म्हटलं.
पालकमंत्री जयकुमार गोरेंवर बोचरी टीका
सोलापूरच्या पालकमंत्र्यांवर टीका करताना भाजपच्या विरोधात कोण लढते त्याची मला चिठ्ठी पाठवा मी त्याचा करेक्ट कार्यक्रम करतो असे सांगत सैराटमध्ये जशी आर्ची परशाला सांगते हा रस्ता थेट शेतात जातो तसे पालकमंत्र्याला थेट माणच्या शेतात नेऊन कार्यक्रम लावायचा आहे काय? असा टोला उत्तम जानकर यांनी मंत्री जयकुमार गोरे यांना लगावला. नगरपालिका निवडणुकांची मतमोजणी लांबणीवर पडल्याबाबतही उत्तम जानकर यांनी सडकून टीका केली आहे. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की भेलकांडतोय हेच सध्या महाराष्ट्राला समजत नाही. कधी कोणाच्या निवडणुका थांबवतोय तर कधी अजून काय करतोय. निवडणूक आयोगावर एवढी कोणाची दहशत आहे, निवडणूक फक्त भाजपनेच लढवायचे अगदी त्यांच्या मित्र पक्षांनाही अडवायचे काम सुरू आहे. सर्वत्र काळोख असून लोकशाही संपलेली आहे.
हेही वाचा
नगरपालिकांचे निकाल मागे-पुढे घेणार नाही, 21 तारखेलाच मतमोजणी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश