लातूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत राडा झाल्याने राज्यभरात छावा संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. कृषीमंत्र्यांचा निषेध नोंदवत छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्ते फेकल्याने राष्ट्रवादीचे (NCP) युवकाध्यक्ष सूरज चव्हाण आक्रमक झाले होते. चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या (Chhava) पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री व पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच, सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांना पदाचा राजीनामा देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तर, सूरज चव्हाण यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली असून आपण विजय घाटगेंची भेट घेणार असल्याचे म्हटले होते. आता, याप्रकरणी विजय घाटगे यांनी रुग्णालयातून आपली प्रतिक्रिया दिली आहे. सूरज चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी, असेही त्यांनी म्हटलं आहे.
सूरज चव्हाणच्या दिलगिरीचं मला काय, काल त्याने 40-50 पोरांना आणून मारहाण केली अन् आज दिलगिरी व्यक्त करतो हा चुकीचा फंडा आहे. ही राजकीय भाषा आहे, त्याने काल काम केलंय, आता आमचं काम सुरू झालंय. सूरज चव्हाण यांनी मी संत नाही असे म्हटले होते. त्यावर, छावा संघटनचे विजय घाटगे यांनीही जशात तसे उत्तर दिले. तू संत नाहीस तर, मीही शांत नाही, आमचा छावाचा तो इतिहास आहे, असे म्हणत विजय घाटगेंनी मी सूरज चव्हाणला ओळखत नाही, सूरज चव्हाणचा राजीनामा ही आमची मागणीच नव्हती. कृषीमंत्र्यांचा राजीनामा ही आमची मागणी आहे.
अटकेची कारवाई व्हावी
ज्यांनी काल आम्हाला मारहाण केली, त्यांच्यावर कारवाई व्हावी, त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी विजय घाटगे यांनी केली. कालपासून मला मनोज जरांगे पाटील, संभाजीराजे छत्रपती, विविध संघटनांचे पदाधिकारी यांचे मला फोन आले, त्यांनी घडलेली घटना चुकीची असल्याचं म्हटलं. दरम्यान, लातूर येथे अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घेतला असून प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली. अजित पवार यांनी भेटायला बोलावल्यानंतरच सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई होणार, असे संकेत मिळाले होते. तर, सुनील तटकरे यांनीही सूरज चव्हाण यांच्या कृत्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली होती. आता, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
लहान माशाचा बळी घेतला की काय?
अजित पवारांनी मोठ्या माशाला वाचवण्यासाठी लहान माशाचा बळी घेतला की काय अशी शंका उपस्थित होत आहे. कारण, या प्रकरणाला जिथून सुरुवात झाली त्या माणिकराव कोकाटे यांच्यावर कोणतीच कारवाई नाही. अजित दादा शेतकऱ्यांचा सातत्याने अपमान करणाऱ्या माणिकराव कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घ्या, अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केली आहे.
दोषींवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे - ओमराजे
कृषी मंत्र्यांना घरी बसवा, अशी मागणी करणारे अखिल भारतीय छावा संघटनेचे नेते विजयकुमार घाडगे पाटील आणि समस्त शेतकरी बांधवांवर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेली मारहाण ही लोकशाहीवरचा थेट हल्ला आहे. शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले, मागणी केली –तर तुमचं उत्तर लाठ्या-काठ्यांमध्ये?हा शेतकऱ्यांचा अपमान नाही तर समाजाच्या प्रत्येक कष्टकऱ्याचा अपमान आहे. या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो. शेतकऱ्यांच्या मागण्यांना दडपण्याचा प्रयत्न चालू दिला जाणार नाही. दोषींवर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे. शेतकरी आमचा स्वाभिमान आहे, आणि त्यांचा अवमान सहन केला जाणार नाही, अशी प्रतिक्रिया धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे.
पत्ते खेळून माणिकराव कोकाटेंचा निषेध
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळातील जंगली रमी खेळताना चा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात विरोधक चांगले आक्रमक झाले आहे. धुळ्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शहरातील झाशी राणी चौकात शिवसेनेच्या वतीने मुख्य चौकात पत्त्यांचा डाव मांडून माणिकराव कोकाटे यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करण्यात आला. तसेच माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा नाही तर त्यांची पक्षातूनच हकालपट्टी करा, अशी मागणी ठाकरे सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.